Sunday, 6 November 2022

मंत्रालयात सामान्य नागरिकांना दुपारी दाेन वाजेपर्यंत प्रवेश बंदी, पूर्वीचा नियम केला लागू !

मंत्रालयात सामान्य नागरिकांना दुपारी दाेन वाजेपर्यंत प्रवेश बंदी, पूर्वीचा नियम केला लागू !


अरूण पाटील, भिवंडी (कोपर), दि. ०७ :
          हे सामान्यांचे सरकार आहे, मला कोणीही भेटू शकतो’ असे मोठ्या अभिमानाने सांगणारे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाची नवलाई अवघ्या १०० दिवसांत मावळली आहे. आता मंत्रालयाचे दरवाजे दुपारी दोन वाजेपर्यंत सामान्य नागरिकांना (अशासकीय अभ्यंगत ) प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसेच सुनावणी असल्याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) सामान्य नागरिकांना प्रवेश मिळणार नाही, असे तोंडी नियम अधिकाऱ्यांना घालून दिले आहेत. परिणामी मंत्रालयाच्या तिन्ही गेटवर आणि सीएमओच्या सहाव्या मजल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांशी रोज वादावादी होत आहे.
           १३ कोटी जनतेच्या महाराष्ट्र राज्याच्या कारभाराचा गाडा नरिमन पाॅइंट येथील सहा मजली मंत्रालयातून हाकला जातो. अडली- नडली कामे घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून जनताजनार्दन येथे येत असतात. २००८ मध्ये प्रथम मंत्रालयात अभ्यागतांना २ च्या नंतर प्रवेश देण्याचा नियम झाला. तो आतापर्यंत लागू होता. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनताच त्यांनी सामान्यांचे सरकार म्हणत सर्वांना सकाळी ११ पासून प्रवेश दिला होता.
           सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयातसुद्धा मुक्तव्दार होते. परिणामी मंत्रालयात मोठी गर्दी होत असे. मुख्यमंत्री कार्यालयात तर पाय ठेवण्यास जागा मिळत नसे. प्रत्येक बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात मोठी गर्दी होत असे. आलेला प्रत्येक अभ्यागत मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे, अशी मागणी करत होता. शेवटी मुख्यमंत्र्यांना मागच्या दाराने बाहेर पडावे लागत असे. ‘आम्हाला काम करणे मुश्कील झाले आहे’ अशी ओरड सीएमओमधील अधिकारी सातत्याने करत होते.
            अखेर अधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे आता मंत्रालयात दुपारी २ पूर्वी कोणाही अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. इतकेच नाही तर मुख्यमंत्री कार्यालयात केवळ सुनावणी असलेल्या अभ्यागतांना प्रवेश मिळेल. आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयात पत्रकारानांसुद्धा दुपारी २ नंतर प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या प्रवेश बंदीविषयी मोठी नापसंती व्यक्त करण्यात येत आहे.
          उद्धव ठाकरेंच्या काळात नागरिकांसाठी कवाडे बंद महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर कोरोनाच्या काळात तब्बल दोन वर्षे मंत्रालयाची दारे अभ्यागतांना पूर्ण बंद केली होती. पूर्ण महाराष्ट्र खुला केला, १०० टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा दिल्या तरी मंत्रालयाची दारे ठाकरे यांनी उघडली नव्हती. त्याचा फटका अप्रियतेच्या रूपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसला होता.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...