लग्नाचा तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीचा ; प्रियकराने ३५ वार करून केला निर्घृण खून !
भिवंडी, दि,५, अरूण पाटील (कोपर) :
विवाहित प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्यावरुन वैतागलेल्या प्रियकराने ३५ वार करुन तिचा निर्घृण खून केल्याची घटना कल्याणच्या जंगलात २७ डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी कल्याण पोलिसांनी मारेकरी प्रियकराला व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
जयराम उत्तरेश्वर चौरे असे त्या मारेकरी प्रियकराचे नाव असून तो बीड येथील रहिवाशी आहे. सुरज गोलू धाटे असे त्याच्या साथिदाराचे नाव आहे. रुपांजली संभाजी जाधव असे खून करण्यात आलेल्या प्रेयसीचे नाव आहे. आरोपी जयराम उत्तरेश्वर चौरे हा पुण्यात राहत होता. तसेच मृत रुपांजली ही देखील पुण्यात आपल्या पती व तीन मुलासह राहत होती. आरोपीही पुण्यात राहत असल्याने त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर आरोपी जयराम आणि रुपांजलीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध निर्माण होऊन शारीरिक संबध प्रस्थापित झाले होते.
मात्र गेल्या काही महिन्यापासून रुपांजली ही प्रियकर जयरामकडे लग्नाचा तगादा लावत होती. त्या मुळे प्रियकर जयरामने त्याचा मित्र सूरजशी संगनमत करून रुपांजलीच्या खुनाचा कट पुण्यात रचला.त्याने कल्याणमधील गोवेलीच्या जंगलात सोने सापडल्याचा बनाव करत प्रेयसी रुपांजलीला पुण्याहून कल्याण ग्रामीण भागातील गोवेली जंगलात आणले. त्यानंतर तिच्यावर धारदार हत्याराने ३५ वार करून तिचा निर्घृण खून करून मृतदेह सोडून दोन्ही आरोपीं पळून गेले.
त्यानंतर २७ डिसेंबर रोजी गोवली जंगलात एका अनोळखी महिलेचा निर्घृण खून केलेला मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपविभागीय अधिकारी राम भालसिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप शिंगटे, हवालदार दर्शन सावळे, इरफान सय्यद, नाईक राहुल बागुल, कॉन्स्टेबल योगेश वाघेरे यांनी गंभीर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध तात्काळ सुरु केला.
दुसरीकडे मृत देहाजवळ आढळून आलेल्या आधार कार्डावरून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सोशल माध्यमांचा आधार घेतला. सोशल माध्यमांद्वारे मृत महिलेचे मित्र व नातेवाईक यांची माहिती पोलीस पथकाने प्राप्त केली. यावेळी जयराम सोबत मृत रुपांजलीचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक पुराव्याने कौशल्यपूर्ण तपास सुरु केला. विशेष म्हणजे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक चाकण, पुणे व बीड या ठिकाणी दबा धरुन बसले होते. त्यामुळेच ४८ तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
No comments:
Post a Comment