भिवंडीतील खासदार राहुल गांधींचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला !
भिवंडी, दि,९, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडीत २०१४ साली खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीत प्रचार सभेत महात्मा गांधींची हत्या आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी केली, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी त्यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणीसाठी पुढील ४ फेब्रुवारी २०२३ ला होणार असल्याचे मा. न्यायाधीश एल.सी. वाडीकर यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितले आहे.
भिवंडी न्यायालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीतील पदाधीकारी राजेश कुंटे यांनी कॉग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला. त्या मानहानी बाबतच्या दाव्याची शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटे तर्फे ॲड. गणेश धारगळकर यांनी बाजू मांडली, तर खासदार राहुल गांधी यांची बाजू ॲड. नारायण अय्यर यांनी मांडली आहे.
आज सोमवारी राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले की, खासदार राहुल गांधींनी सुनावणीसाठी केलेल्या वैयक्तिक हजेरीतून सूट देण्याच्या अर्जाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र खासदार राहुल गांधी यांनी मागितलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्द्यावर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी युक्तिवाद केला जाईल, असे राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले.
या प्रकरणातील सविस्तर हकीगत अशी आहे की, भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या २०१४ साली लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी यांनी महात्मा गांधींजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असे वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिके विरोधात राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून सदरच्या याचिकेची सुनावणी दिल्ली न्यायालयांत करण्याची विनंती केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रासोबत भाषणातील उतारा दाखल केला होता.
तो उतारा भिवंडी कोर्टात पुरावा म्हणून दाखल करून घ्यावा, असा अर्ज याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला होता. परंतू १२ जून २०१८ रोजी भिवंडी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच राहुल गांधी यांच्या वकीलांनी ही याचिका समन्स ट्रायल प्रमाणे चालविण्याची मागणी केली तसेच उच्च न्यायालयातील कागदपत्रे भिवंडी न्यायालयांत दाखल करून घेण्यास न्यायालयास विरोध दर्शविला होता. त्यावेळी ही याचिका समन्स ट्रायल प्रमाणे चालविणयास न्यायालयाने मान्यता दिली होती.
No comments:
Post a Comment