जागृती मंच मुंबईची एकेरी गायन स्पर्धा संपन्न !
मुंबई, (गुरुदत्त वाकदेकर) : वरळी लालबाग परळ या गिरणगावत उदयास आलेली जागृती मंच ही संस्था गेली तेवीस वर्षे सातत्याने शालेय विद्यार्थी, युवक-युवती, महिला व जेष्ठ नागरिक यांच्याकरिता विविध शैक्षणिक, क्रीडा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करते. स्पर्धा महोत्सवाचे यंदाचे २४ वे वर्ष मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून जवळपास साडेतीन-चार हजार स्पर्धक या स्पर्धा महोत्सवात सहभागी होतात. उदयोन्मुख कलाकार व खेळाडू यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व त्यांच्यात सामावलेले सुप्त गुण, कला-कौशल्य व क्रीडा आविष्कार यांना विकसित करून त्यांना चालना देण्यासाठी सदर महोत्सवाचे आयोजन केले जाते. रविवार दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता ना. म. जोशी मार्ग, मुनिसिपल शाळा, डीलाईल रोड येथे एकेरी गीत गायन स्पर्धा कराओके माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. अगदी इयत्ता पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून जेष्ठ नागरिकांसह महिलांची उपस्थितीही वाखवण्याजोगी होती.
गाण्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या स्पर्धकांनी या स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभागी होऊन त्यांच्या अंतरंगात असलेल्या गायकीला आपल्या स्वरात गाऊन समस्त रसिकांना मंत्रमुग्ध केले. साडे चार तास चाललेल्या या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी अगदी गीत रामायण, भक्ती-भावगीते, सदाबहार लावण्या, जुन्या मराठी व हिंदी चित्रपटातील गाण्यांचा नजराणा पेश करीत मैफलीमध्ये रंगत घडवून आणली. सकाळ समूहाचे मार्केटिंग मॅनेजर दिनकर कोकितकर व जागृती मंच यांच्या अध्यक्ष राम साळगावकर यांनी देखील प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होऊन गाणी गायली. गाता रहे मेरा दिल ही या स्पर्धेची संकल्पना होती. स्पर्धा प्रमुख या नात्याने अनिल पाटकर यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. जागृती मंचाचे सरचिटणीस विष्णू कानेरकर, चंदू गावडे, ओमकार साळगावकर, संदीप दाभिळकर, अनिल जाधव, तुषार होडगे, प्रीतम साळवी, प्रशांत कानडे, अमर साळवी या या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील शिंदे - आमदार, आशिष चेंबूरकर - विभाग प्रमुख, निरंजन नलावडे - संघटक व जागृती मंचाचे अध्यक्ष राम साळगावकर यांच्यासह सकाळ समूहाचे दिनकर कोकितकर इत्यादी मान्यवर लाभले. या सुरेख व देखण्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सावंत व महादेव दोरुगडे यांनी सुंदर शब्दांची गुंफण घालत रसिकांची मनं जिंकली. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध संगीत विशारद व गायिका प्रणाली तळवडेकर यांनी केले. तर संगीत संयोजन व वाद्यवृंद याची धुरा शिवाजी निमणकर यांनी उत्तमरित्या सांभाळली.
स्पर्धेतील विजेचा स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे:-
प्रथम क्रमांक - शिवम लोहार - रुपये ५,०००/- व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक - वेदश्री जाधव - रुपये ३,०००/- व आकर्षक चषक
तृतीय क्रमांक - निलेश वेलणकर - रुपये २,०००/- व आकर्षक चषक
विजय कोरी व कुमारी सलोनी बागवे यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये ५५५/- व आकर्षक चषक देऊन या विजेत्यांना गौरविण्यात आले व पुढील वाटचालीसाठी जागृती मंचाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment