लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून जी-20 परिषद यशस्वी करुया - *- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड*
औरंगाबाद दि ११ : जी-20 आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने विदेशी पाहुण्यांचे 26 फेब्रुवारी रोजी शहरात आगमन होईल. या परिषदेसाठी अनेक देशातील प्रतिनिधी येणार आहेत. देशांतील 56 शहरांमध्ये आपल्या जिल्ह्याला आयोजनाची संधी मिळालेली आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून जी-20 परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रीय वित्तराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जी-20 आणि वेरुळ-अजिंठा महोत्सवाच्या अनुषंगाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय तसेच विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला पाण्डेय यांनी जी-20 परिषदेची रुपरेषा, करण्यात आलेले नियोजन तसेच वेरुळ-अजिंठा महोत्सवाच्या नियोजना विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी राजकीय प्रतिनिधींनी देखील सूचना मांडल्या.
डॉ. कराड म्हणाले जी-20 परिषदेच्या यशस्वीतेमुळे आपल्या जिल्ह्याची जगामध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण होणार आहे. सध्या शहरात सौंदर्यीकरणाचे खुप चांगले काम सुरू आहे. या अुनषंगाने लोकप्रतिनिधींच्या काही सुचना असल्यास त्या प्रशासनाला कळवाव्यात. शहराची प्रतिमा उंचावण्याचे काम प्रशासन करतच आहे परंतु नागरिकांनी देखील या कार्यात सहभाग घ्यावा आणि आपल्या शहराला आणखी चांगले बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. कराड यांनी केले.
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त म्हणाले की, या कालावधी दरम्यान नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, आपले वाहन बेशिस्तपणे कुठेही उभे करु नयेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने या कालावधी दरम्यान कोणत्याही पक्षाने आंदोलन करु नये. या आवाहनाला सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवित आंदोलन न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी जी-20 परिषदेसाठी येत असलेल्या सर्व विदेशी पाहुणे, परिषदे दरम्यान घेण्यात येणारे चर्चासत्र, बैठका तसेच करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती लोकप्रतिनिधींना दिली. ते म्हणाले या परिषदेसाठी 4 नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून समन्वयक म्हणून अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. विमानतळ (कुलदीप जंगम, भा.प्र.से), हॉटेल रामा इंटरनॅशनल आणि हॉटेल ताज विवांता (रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी) आणि वेरुळ (जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी) अशा 4 ठिकाणी नियंत्रण कक्षाची तर जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुमची देखील स्थापणा करण्यात आलेली आहे. नागरिकांनी शक्य असल्यास आपल्या घरांवर विद्युत रोषणाई करावी जेणेकरुन शहर आणखी सुंदर दिसेल. शहर सौंदर्यीकरणाचे काम आठ दिवसांत पुर्ण होणार आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन पाण्डेय यांनी केले.
या बैठकीला डॉ. कल्याण काळे, कल्याण चव्हाण, भाऊसाहेब जगताप, कॉ. सय्यद अली अशफाक सलामी, सुधाकर विश्वनाथ शिंदे, सुमीत खांबेकर, राजेंद्र जंजाळ, राहूल सावंत, टी.वाय. धनवडे, व्ही.ए.बाचके, अमोल पवार, शेख युसुफ आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment