Wednesday, 8 February 2023

वेरुळ-अजिंठा अंतराष्ट्रीय महोत्सव २०२३ शहरवासीयांनी व पर्यटकांनी लाभ घेण्याचे आवाहन !

वेरुळ-अजिंठा अंतराष्ट्रीय महोत्सव २०२३ शहरवासीयांनी व पर्यटकांनी लाभ घेण्याचे आवाहन !

औरंगाबाद, अखलाख देशमुख‌, दि ८ : पर्यटन वाढीसाठी जागतिक स्तरावर औरंगाबाद जिल्हयाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय सातत्याने प्रयत्न करते. विविध सेमीनार, परिषदा इ. चे आयोजन करुन अधिकाधिक पर्यटक कसे येतील यासाठी प्रयत्नशील असते. औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 1985 पासून वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी वेरूळ महोत्सव आयोजित करण्यास सुरूवात केली होती. सदर महोत्सवाचे रूपांतर 2002 पासुन वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले. 

सदर महोत्सव जिल्हा प्रशासन, संयोजन समिती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येतो. प्रतिवर्षीप्रमाणे सन 2016 साली वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागच्या काही काळात विविध कारणांमुळे हा महोत्सव होऊ शकला नाही. ​ 
वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त पर्यटनाला चालना देण्याची व भारतीय अभिजात कला, नृत्य, साहित्य-संस्कृती यांच्या प्रचाराची मोठी संधी मिळाली आहे. 

या वर्षी दि. 25, 26 व 27 फेब्रुवारी 2023 रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय व उपशास्रीय गायन व नृत्य इ. सादर केले जाणार आहे. सदर महोत्सवामध्ये उस्ताद राशीद खान, सुजात खान, गायक महेश काळे, शंकर महादेवन, वादक रवी चारी, शिवमनी, विजय घाटे व नृत्यांगना संगीता मुजूमदार आपल्या कला सादर करणार आहेत.  

सदर महोत्सवाची सुरुवात पूर्वरंग या विशेष कार्यक्रमाने दि.12 फेब्रुवारी 2023 पासून होईल. संत एकनाथ रंगमंदिर येथे पूर्वरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये सुप्रसिध्द बॅले नृत्य, सोनीया परचुरे व संच यांच्याद्वारे सादर करण्यात येणार आहे. तसेच सांज अमृताची हा मराठी व हिंदी गाणी, सुफीगाणी यांचा कार्यक्रम गायक शाल्मली सुखटनकर, आशिष देशमुख, मंदार आपटे व माधुरी करमरकर सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनश्री दामले करणार आहेत.

पूर्वरंग या कार्यक्रमाचे उदघाटन रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे, कोळसा व खाण आणि भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपान भुमरे, पालकमंत्री तथा मंत्री रोहयो व फलोत्पादन, महाराष्ट्र राज्य असणार आहे. या कार्यक्रमासाठी सह अध्यक्ष अब्दुल सत्तार, मंत्री, महाराष्ट्र राज्य,अतुल सावे, मंत्री, सहकार व पणन, सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य व प्रमुख पाहुणे अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद महाराष्ट्र राज्य राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, मुंबई हे असणार आहेत. यासोबतच जिल्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
​वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव-2023 मधील या सर्व कार्यक्रमांचा शहरवासीयांनी तसेच सर्व पर्यटकांनी आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन, संयोजन समिती तसेच पर्यटन संचालनालयाद्वारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

वर्दीतले भाऊ, आयुष्यभराचे सोबती: महाराष्ट्र पोलिस कर्मचाऱ्याने धाकट्या भावासाठी यकृतदान करून वाचवले प्राण !!

वर्दीतले भाऊ, आयुष्यभराचे सोबती: महाराष्ट्र पोलिस कर्मचाऱ्याने धाकट्या भावासाठी यकृतदान करून वाचवले प्राण !! कल्याण, २९ जानेवारी...