वर्दीतले भाऊ, आयुष्यभराचे सोबती: महाराष्ट्र पोलिस कर्मचाऱ्याने धाकट्या भावासाठी यकृतदान करून वाचवले प्राण !!
कल्याण, २९ जानेवारी २०२६ : आजच्या युगात धैर्य, त्याग आणि अटूट बंधुत्वाची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या धाकट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा (लिव्हरचा) एक भाग दान केला. शौर्य नेहमी रस्त्यावरच दिसते असे नाही, कधी कधी ते ऑपरेशन थिएटरमध्येही घडते, याची ही जिवंत साक्ष आहे.
ही जीवनदायी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात डॉ. स्वप्निल शर्मा (सल्लागार – लिव्हर ट्रान्सप्लांट व जठरांत्र शल्यविशारद) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.
३८ वर्षीय धाकटा भाऊ अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला तीव्र ‘अक्यूट-ऑन-क्रॉनिक लिव्हर फेल्युअर’चा त्रास होता. तीव्र पिवळेपणा, व्हेंटिलेटरवरील अवलंबित्व आणि रक्तदाब टिकवण्यासाठी औषधांची गरज अशी त्याची प्रकृती होती. त्याच्या जगण्याची एकमेव आशा म्हणजे तातडीचे यकृत प्रत्यारोपण.
क्षणाचाही विलंब न लावता, महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेला त्याचा मोठा भाऊ जिवंत दाता म्हणून पुढे सरसावला.
दाता भावाने सांगितले, “पोलिस म्हणून आम्हाला इतरांचे प्राण वाचवण्याचे प्रशिक्षण दिले जाते — स्वतःचा धोका पत्करूनही. पण यावेळी ती वर्दी किंवा कर्तव्याची बाब नव्हती; तो माझा धाकटा भाऊ होता. जर मी त्याला आयुष्याची दुसरी संधी देऊ शकत असेन, तर माझ्या मनात कोणताही प्रश्न नव्हता. त्यानेही माझ्यासाठी हेच केले असते.”
सखोल वैद्यकीय तपासणीनंतर मोठा भाऊ दानासाठी योग्य असल्याचे आढळले. शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, परंतु ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यासाठी शल्यविशारद, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, विशेष प्रशिक्षित ICU परिचारिका, आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट अशा बहुविद्याशाखीय लिव्हर ट्रान्सप्लांट पथकाने काटेकोर समन्वय साधला.
डॉ. स्वप्निल शर्मा म्हणाले, “अक्यूट-ऑन-क्रॉनिक लिव्हर फेल्युअरमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ही आमच्यासाठी सर्वात आव्हानात्मक शस्त्रक्रियांपैकी एक असते. या प्रकरणात केवळ वैद्यकीय गुंतागुंत नव्हे, तर दोन भावांचे असामान्य भावनिक बळही ठळकपणे दिसून आले. प्रेम, त्याग आणि विज्ञान यांनी एकत्र येत मृत्यूवर मात केलेली ही दुर्मीळ घटना आहे.”
आता प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असलेला धाकटा भाऊ भावूक होत म्हणाला,“मी माझे आयुष्य माझ्या भावाला देणे लागतो. आम्ही दोघांनी एकच वर्दी घातली आहे, पण यावेळी त्याने मला पोलिस म्हणून नाही, तर कुटुंबातील सदस्य म्हणून वाचवले. हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही.”
सध्या दोन्ही भाऊ प्रकृती सुधारण्याच्या मार्गावर आहेत — एक पुन्हा निरोगी आयुष्याकडे, तर दुसरा पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याच्या तयारीत. यकृत प्रत्यारोपणातील आधुनिक वैद्यकीय प्रगती आणि मानवी धैर्य यांची सांगड घातल्यास नियतीलाही बदलता येते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
ही उल्लेखनीय घटना भारतातील वाढत्या लिव्हर ट्रान्सप्लांट क्षमतेसोबतच मानवी नात्यांच्या सामर्थ्याचीही जाणीव करून देते. वैद्यकीय उत्कृष्टता, योग्य वेळी केलेला हस्तक्षेप आणि भावाने केलेला असामान्य त्याग — या सर्वांनी मिळून एक जीव वाचवला. काही सर्वात मोठी शौर्यकृत्ये टाळ्यांच्या गजरात नव्हे, तर प्रेमाने प्रेरित शांत कृतीतून घडतात, याची ही प्रेरणादायी आठवण आहे.
No comments:
Post a Comment