एसटीचा_प्रवास_
करमणुक_हमखास...
--------------------------------
"चला ताई, कुठं जायच? चला...चला… आणि तिकिटाला सुट्टे पैसे द्या की…. एकदम पाचशे ची नोट?"
"म्हंजे? तें पैशे न्हाईयेत का?"
"आहो पण पंचेचाळीस रुपयाच्या तिकिटासाठी एकदम पाचशे?"
"हां बाबा, आता तुला सुटे पैशे द्यायचे म्हनून मंदिराच्या दाराशीच बसत्ये कटोरा घिवून…"
:
:
"ओ ताई, हे वाटेतलं गठोडं उचला की… या जायला वाट त हवी का नको?"
"जागा हाय का म गठोडं ठ्यवायला?"
"त्याला मी काय करु?"
"तू काय करु नकोस बाबा, मीच करती…. गठोडं शिटावर ठिवती आणि मी जमिनीवर बसती…. लै शाना ना तू!"
"चला.. वाटेतून पुढे चला… आणि तिकीट घ्या…"
:
:
"भाऊ, रांध्याच्या पिंपळगावला बस जाती का रे ?"
"ओ आजी, ती बस दुसरी… ही चुकीची बस पकडली तुम्ही…. पुढल्या स्टॉपला उतरून घ्या… ही बस उंबरठाणला जाती ये"
"तू कोन सांगणार शान्या? त्या कंडक्टरला सांगू द्ये की?
"आजी तें सांगतात तें बरोबरे.. पुढल्या स्टॉपला उतरून घ्या तुम्ही."
"मी कायला उतरू? मी उंबरठांचच तिकीट काढेल ए…. तुला निस्ती इचारू रह्यायली त…"
:
:
"ओ बाई…. तें पोरं सांभाळा हो… मुतलं बघा ते माझ्या मांडीवर.."
"ए बाबा, उगा वरडू नको…आवरती थांब….तू काय मुतला नाई का लहानपनि?"
:
:
"म्हतारीचा चष्मा आनायचा ए म्हनून निगालो..."
"फुल पडेल ए का?"
"काय जनु... दिसना झालंय म्हंती!"
"सुनेला बर्रर्र नां भो!"
"काय बोलत्ता नाना!"
"तसं नाय रे... म्हतारपन लई वाईट बग... चार शनावर तरी कर म्हणावं!"
"इठोबाला सांगलं ए... द्येव करल काय त्ये!"
:
:
"सरकून घ्याना बाबा जरा"
"अहो आता आणखी किती सरकू? खिडकीतून बाहेर पडून जाईल मी...."
"काई मानुस्की है का नाई?"
"त्येनला कसली बाय मानुस्की!! बसच विकत घ्येल ए त्यांनी... त्येनला काय बाई-मानुस नाई न काई नाई!"
"ओ बाई, मी पण तिकीट काढलंय...."
"उपकार क्येले रे बाबा! लै उपकार क्येले!!!"
:
:
"या माय...अग शके तु?"
"ईजे तुग ? ..आग् किती वर्षानी भेटती.. अग ये हिकडं...ओ बाबा जरा सरका की मधी..
:
:
"काय म्हंतीस् ? काय म्हंता आमचे "भावज्जी"?
"मज्जेत..भावजी त् एकदम मज्जेत."
"आत्ता !! असतीलच की म् 'मज्जेत' !
"ए गप ना, शेजारी म्हातारं बशेल ए"
:
:
"ए बाबा, हित्त बसु नको"
"का ब्र? रिकामीचे नां शीट"
"हा रिकामीचे, पण लेकराला यस्टी लागती.. अंगावर डकला त्त गागशील..."
:
:
"तुम्हाला सांगते वन्स, हा प्रवास करायचा म्हणजे धस्स होतं अगदी "
"या बँकवर्ड माणसांत नक्को होतं गं! कसेकाय लोकं प्रवास करतात!"
:
:
"ए बाबा इड्या ओढू नको.. घरी दारी म्येलं त्येच!"
:
:
:
"बाकी काय म्हंतीस ? चालू ए का तुझ्यावालं अफेर ?"
"अग् कसलं अफेर फिफेर.. काय बी बोलाच्या पोरी... आमच्या हीथ खोली घ्युन र्हातो तो..म्हनून ओळक"
"अस्स व्हय ? फकस्त खोली घ्युनच् र्हातो काऽऽऽय? आनी कुनी नसतांना मीठ्या मारून पाठ दुखती का इचारतो??"
"गप्....गप ना शान्ने ...."
:
:
"शिरीहरी...शिरीहरी...शिरीहरी...."
:
:
"अन् का ग? तो काळुंद्र्या काय करतो आता ?"
"कोन ग् ?"
"अग तो नाईका तुला एशेमेश पाठवाचा..अग त्यो ग त्यो दात पुढेल.."
"हां हां बाल्या व्है ! तो आता लै शिरेस झाला ना... आता लॉले ए.."
"म्हंजी त्त आता नानी का नानाच्याच तोऱ्यात असलं "
:
:
:
"मी तिकडे जाऊन बसू का? तुम्हा मैत्रिणींना गप्पा मारता येतील."
"हां हां थ्यांक्यु बर का... आनी अंकल बेश्ट लक बरंका तुमाला"
:
:
:"बरं झालं त्ये म्हातारं उठून ग्येल…. लई कान द्यून ऐकत होतं!"
नंदकुमार देशपांडे
No comments:
Post a Comment