कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण !
ठाणे, अखलाख देशमुख, दि ९ : पूर्व द्रुतगती महामार्गावर हा ५+५ मार्गिकांचा आहे तर ठाणे शहरातील कोपरी रेल्वे ओलांडणी पुल हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. २+२ पथ मर्गिकेच्या पुलाचे ४+४ असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे.
या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेज पर्यंत महामार्गाखालून वाहानांच्या रहदारीसाठी २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.२ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वाहिनीची सुविधा उपलब्ध करून देणारा बंदिस्त नाल्याचे सुधारीकरण देखील करण्यात आले आहे.
कोपरी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी केक कापण्यात आला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जय जित सिंह आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment