भाजप शिंदे गट एकमेकांच्या विरोधात, बंडखोरी देखील जोरात, बाजार समितीच्या निवडणुकीत मतदार' मालामाल ?
कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील चार बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप शिंदे गट एकत्र युती करून निवडणुका लढवतील अशी चर्चा सुरू असतानाच जागा देण्या घेण्यावरुन दोघामध्ये वितुष्ट आले असून यामुळे हे एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून निवडणुकीत उभे राहिले असून यावेळी बंडखोर देखील जोरात आहेत. त्यामुळे मतदारांना भेटण्यात, त्यांना समजावून सांगण्यात उमेदवार तनमनधनाने जोरदार प्रयत्न करत आहेत. यामुळे मतदार मात्र, मालामाल होतील असे वाटते.
ठाणे जिल्ह्यातील भिंवडी, शहापूर, मुरबाड आणि उल्हासनगर या ४ बाजार समितीच्या निवडणूकांची रणधुमाळी उठली आहे. भर उन्हात, अंगाची लाहीलाही होत असताना या निवडणुका मुळे वातावरण ही तापले आहे. राज्यात भाजपा व शिंदेगट यांची युती सरकार असल्याने जिल्ह्यातील या निवडणुका देखील युतीत एकत्रपणे लढवल्या जातील अशी चर्चा सुरू होती. मात्र मुरबाड मध्ये भाजप व शिंदेगट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. उल्हासनगर मध्ये ५ जागा शिंदे गटाला दिल्या असताना देखील एकमेकांच्या विरोधात निवडणूका लढवीत आहेत,
भिंवडी बाजार समितीत भाजप व शिंदे गटात युती असताना येथे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.यामध्ये अनेक आजी माझी संचालक, सभापती, आहेत, महाविकास आघाडीलाही बंडखोरीची लागण झाली आहे. एकूण ६५ जागासाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भिंवडी बाजार समितीत १४ जागेसाठी ३० उमेदवार, उल्हासनगर १७ जागासाठी ३३ उमेदवार, शहापूर १७ जागेसाठी ४४ उमेदवार आणि मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ जागाकरिता ३९ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.
चार (४) बाजार समितीच्या निवडणुकीत ७ जागा बिनविरोध निवडल्या असून यामध्ये भाजप व शिंदे गट आघाडीवर आहे. तसे पाहिले तर काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गट हे एकत्रीत निवडणूक लढवित असले तरी त्यांच्या मध्ये सर्व अलबेल आहे, बंडखोरी नाही असे मुळीच नाही. त्यामुळे बाजार समितीवर कोणत्याही एका पक्षाला सत्ता मिळेल असे मुळीच वाटत नाही. त्यामुळे येत्या ३० एप्रिल रोजी बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कडक ऊन्हात वातावरण अधिक तापणार आहे, उमेदवार मतदारांना डायरेक्ट भेटण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असून यामुळे बाजार समितीचे मतदार'मालामाल, होणार असे चित्र दिसत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा कणा असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होईल हे लवकरच स्पष्ट होईल.
No comments:
Post a Comment