Tuesday, 25 April 2023

भिवंडीतील मीनाताई ठाकरे रंगायतन हॉलला लागली भीषण आग, भंगार जळून खाक !


भिवंडीतील मीनाताई ठाकरे रंगायतन हॉलला लागली भीषण आग, भंगार जळून खाक !

भिवंडी, दि,२६, अरुण पाटील (कोपर) :
         भिवंडी शहरातील मीनाताई ठाकरे रंगायतनला  अचानक भीषण आग लागली. ह्या आगीमध्ये रंगायतनच्या बाहेर ठेवलेले भंगार जळून खाक झाले आहे
        भिवंडी शहरातील ठाणगे आळी येथील मीनाताई ठाकरे रंगायतनचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्या साठी रंगायतनच्या इमारतीबाहेर भंगार काढण्यात आला होता. या भंगाराला मंगळवारी अचानक आग लागली. या आगीत कचऱ्यात टाकलेली औषधे व गोळ्याची पाकिटे जळाल्याचे समोर आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील भ्रष्ट कारभार उघडा पडला आहे. या आगीमुळे विद्युत उपकरणाच्या केबल जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा सुमारे पाच तास खंडित होता. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
           भिवंडी महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे रंगायतनच्या मूळ प्रवेश द्वाराजवळ असलेल्या फर्निचरला मंगळवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. ह्या आगीचे लोळ सभोवताली पसरल्याने त्याखाली असलेल्या गोळ्यांची पाकिटे आणि औषधाच्या बाटल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या रंगायतनच्या पहिल्या मजल्यावर इदगाह रोड प्राथमिक आरोग्य केंद्र व बिजीपी दवाखाना सुरु होता, 
         तर तळमजल्यावर कोविड उपचार केंद्र सुरु आहे. त्यामुळे या विभागातून हा औषधांचा साठा कचऱ्यात टाकला गेला असावा, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. रंगायतांच्या मूळ प्रवेशद्वाराजवळ भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने अग्निशामक दलास रस्त्यावरून पाणी टाकून आग विझवावी लागली. त्यामुळे आता प्रवेशद्वाराजवळील भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणाचा मुद्दाही या निमित्ताने ऐरणीवर आला आहे
             या आगीमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या उपकरणाच्या केबल जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागला. काही इमारतीमध्ये लोकांना पाणी मिळाले नाही. मुख्य म्हणजे मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये आग प्रतिबंधक सुविधा नसल्याचे या आगीमुळे समोर आले आहे. 
            आता महापालिकेतील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपली जबाबदारी स्वीकारून झालेल्या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.पाच दिवसापूर्वीच भिवंडीतील गोविंद कंपाउंड येथील एका प्लॉस्टिक मोती कारखान्याला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये संपूर्ण मोती कारखाना जळून खाक झाला आहे.
           या आगीत कारखान्यातील मशीन्स जळून खाक झाल्या आहेत. तसेच कारखान्यात केमिकलयुक्त ज्वलनशील पदार्थ, प्लॉस्टिक दाना, दाण्यापासून तयार करून ठेवलेला माल यांचा साठा होता. त्यामुळे कारखान्यातील आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. आगीची घटना समजताच सर्व कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढला. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...