*आजीचे गाव*
ऊषा आणी उमा आज खूप खुश होत्या, कारण उन्हाळ्याची सुट्टी त्यात तुपात साखर म्हणजे उद्या त्या आपल्या गावी जाणार होत्या. नुसत्या कल्पनेनेच त्या रात्रभर झोपल्या पण नव्हत्या. गावच्या आठवणी मध्ये रमत असतांना पहाटे पहाटे त्यांना झोप लागली इतक्यात सकाळी सकाळीच आईने आवाज दिला, ऊषा, उमा अग ऐकलत का ! सूर्य उगवला आहे तुम्हाला आजीच्या गावी जायचं आहे ना. आईचा आवाज ऐकून रोज उठण्यासाठी शंभर कारणे सांगणाऱ्या दोघी बहिणी बिछान्यातून पटकन उठल्या. आईने बनवलेला उपमा त्यांनी उभ्या-उभ्यानेच एका झटक्यात फस्त केला.... पटापट तयारी करून आजीसाठी आईने दिलेली काजू कतली पटकन बॅग मध्ये भरली आणि गाडीत जाऊन बसल्या.
आजीचे गाव दूर उंच-उंच डोंगरदऱ्या मध्ये वसलेले, गावशेजारीच बारमाही वाहणारा शुभ्र झरा. गावी पोहचेपर्यंत ऊन माथ्यावर आले होते. मे महिना असल्यामुळे सूर्य वरून आग ओकत होता. गावाच्या वेशीवर आमच्या स्वागतासाठी आमच्या गावच्या मैत्रिणी उज्वला, उत्कर्षा, शीतल, मीना आधीच येऊन उभ्या होत्या.
पाठीवरची बॅग आजीच्या हाती देत आम्ही उड्या मारतच नदीवर खेळायला निघालो. उथळ पाण्यात उतरून एकमेकींवर पाणी उडवणे, उसने पैशांचा उधारी उधारीचा खेळ खेळणे आजीच्या गावी आम्ही खूप मजा,धमाल केली. कैरी, करवंदे खात, धमाल करत दिवस कसे सरले कळलेच नाही. घरी यायला पाय धजावत नव्हते त्यात मैत्रिणींचा आम्ही जातोय म्हणून पडलेला चेहरा पाहून खिन्न वाटत होते... पण काय करणार नाईलाज होता..उदास पावलांनी आम्ही गाव सोडले पण सोबत मात्र कधीही न हरवणारा असा ठेवा घेऊन आलो... आठवणींचा खजाना, आणि आजीची गोड पप्पी.......
लेखक -
श्री.सुभाष रामचंद्र गाडगे
मु.वाशिंद पो.गोमघर
No comments:
Post a Comment