त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदू महासभेकडून शुद्धीकरण; कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडत केल्या जोरदार घोषणाबाजी !
भिवंडी, दि,१७, अरुण पाटील (कोपर) :
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदू महासभेतर्फे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले आहे. सोमवारी रात्री (ता. 15) एका जमावाने बळजबरीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. पुन्हा असा प्रयत्न होऊ नये, यासाठी हे शुद्धीकरण करत असल्याचे हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले आहे.
आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास हिंदू महासभेचे कार्यकर्ते मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर जमा झाले. त्यानंतर त्यांनी गोमूत्र शिंपडून प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. याबाबत अधिक माहिती देताना आनंद दवे यांनी सांगितले की, काही जणांनी मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नाशिकचीच जनता पुरेशी आहे. मात्र, त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज राज्यभरातून कार्यकर्ते येथे आले आहेत.
आनंद दवे म्हणाले, हिंदुस्थानचे राष्ट्रगीत नाकारणाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आम्ही गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. सर्वजण येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, इतर धर्मियांनी चादर चढवणे यासारखी कोणतीही परंपरा येथे नाही.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आतापर्यंत चार उरूस आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सलोख बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करत या प्रकरणी एसआयटीची नेमणूक करण्यापेक्षा डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा, या प्रकरणावर बोला असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे नियोजनबद्ध काम सध्या सुरु आहे. नकली हिंदुत्वाच्या नावाने भजन करणाऱ्या अनैतिक मार्गाने सत्तेत आलेल्यांना लोकांचा पाठिंबा नाही. दंगली घडवून राजकारणाचा डाव यशस्वी होणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. वाचा सविस्तर
No comments:
Post a Comment