गाळ काढण्याचे काम वेगाने करा - 'जिल्हाधिकारी निमा अरोरा'
*गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार*
अकोला, अखलाख देशमुख, दि.४ : ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ हे अभियान येत्या १५ जून पर्यंत राबविण्यात येणार आहे. जल प्रकल्पातील साचलेला गाळ काढण्याचे काम वेगाने करा,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले. दरम्यान जिल्हा परिषदेमार्फत ६१ कामांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
जिल्ह्यात राबवावयाच्या ‘गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार’ अभियानासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी राजेश गिरी, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी डी.एस.खंदारकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी एम. बी. काळे, मृद व जलसंधारण अधिकारी आर.एन. ठोके तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
उपजिल्हा जलसंधारण अधिकारी राजेश गिरी यांनी माहिती सादर केली की, जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषदेकडून ६१ कामांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. ही कामे ग्रामपंचायतींकडून प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर कामे सुरु करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. प्रति ब्रास वाहतुक प्रणाली खर्च हा शासनाने भरावयाचा असून त्यासाठीही अंदाजपत्रकात तरतूद करावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच अशासकीय संस्थांनी कामे वेगात पूर्ण करावी, असे निर्देशही दिले.
No comments:
Post a Comment