पावशेपाडा, वरप, रायते, मानिवली आदी अनेक गावांना पावसाळ्यात जलसमाधी? मोठी 'भरणी' कारणीभूत, प्रशासनाचे दुर्लक्ष !
कल्याण, (संजय कांबळे) :: नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करून सखल भागात मोठ्या प्रमाणात केलेल्या माती, मुरुम, दगड, विटा आदीच्या भरणीमुळे यंदा पावसाळ्यात उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या पावशेपाडा, वरप, मोरयानगर, रायते, मानिवली, आपटी आदी असंख्य गावांना "जलसमाधी, मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे कारण शोधले असता जागोजागी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडवले असून त्या सखल भागात केलेली मोठ्या प्रमाणावर भरणी, हे समोर येत असून याकडे प्रशासन मात्र सोईस्कर दुर्लक्ष करत आहे.
कल्याण तालुक्यात काळू नदी ही रुंदे, फळेगाव, टिटवाळा, वासुंदी, आदी भागातून वाहते, उल्हास नदी वरप, कांबा, रायते, आणे, आपटी, मानिवली, मोहिली, पावशेपाडा, मोहने, इत्यादी गावातून वाहते, भातसा नदी खडवली, वाळकस, राये तर बारवी दहागाव, पोई,भेरल्यांची आपटी, आदी गावातून वाहते, २६ जुलै २००५ मध्ये सुमारे ४ हजार १८ मिमि इतका पाऊस पडल्याने नदी काठच्या गावांचे होत्याचे नव्हते झाले होते. जिवीत व वित्त हानी खूप प्रमाणात झाली होती.
यानंतर २०१३, १७, १९, २० मध्ये देखील ३ हजार च्या वरती पाऊस पडला होता.यावेळी नुकसानग्रस्त कुंटूबाना जवळपास १०/१२ करोड रुपयांची मदत वाटप करण्यात आली होती. एनडिआरफ टिमच्या साह्याने अनेकांचे जीव वाचविले होते. परंतु सध्याची परिस्थिती खूपच बिकट आहे, कारण तालुक्यातून मुंबई वडोदरा एक्स्प्रेस, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, ट्रिपल टू महामार्ग आणि कल्याण (आंबिवली) ते मुरबाड हा नवीन रेल्वे लाईन हे कांबा, रायते, गोवेली, मोहने,अटाळी, आंबिवली, बल्याणी,उभर्णी, मोहिली, मानिवली आदी गावात...
या सर्वामुळे सखल भागात १८ ते २० फुटांपर्यंत भरणी केली आहे. तर पावशेपाडा येथे 'सेंच्युरी रेआँन कंपनी'च्या "बिट्स स्कूल आँफ मँनेजमेन्ट" ने असाच भराव केला आहे. बाकी बहुतांश इतर गावात सखल भागात मातीचा भराव करून चाळी बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर अगदी, उल्हास, बारवी, काळू आणि भातसा नदीच्या पात्रात बांधकामे केली आहेत. यामुळे दिवसेंदिवस नदीचे पात्र कमी होत आहे. काही ठिकाणी तर नदीचा नाला होण्याच्या मार्गावर आहे.
कल्याण मुरबाड मार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान सिंमेट काँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू असून याची उंची अधिक असल्याने रस्त्याच्या दुतर्फा भागातील घरात पावसाचे पाणी शिरणार आहे. वर्षानुवर्षे पेक्षा यावेळी म्हारळ, वरप, कांबा, मोरयानगर, रायते,पावशेपाडा आदी परिसरांना अधिक धोका असताना दुर्दैवाने काही लोक मात्र या भरणीचे समर्थन करत असून पुराचे पाणी काय नाव विचारुन घरात घुसणार नाही हे यांना कोण सांगणार?
विकास, प्रगती, तगडा कर मिळतो म्हणून गावाना जलसमाधी मिळणार असेल, गावे भकास होणार असतील, तर असा विकास काय कामाचा? याचा विचार करावा अन्यथा आपली अवस्था, तेल गेले, तूपही गेले व हाती धुपाटन आलं, असी होईल.
*अभिजित भांडे पाटील (प्रांताधिकारी, कल्याण) -
-नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केल्यास तो दुर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील.
*संभाजी सुरोशे (ग्रामस्थ) रायते. ता कल्याण...
या वेगवेगळ्या महामार्ग व मातीच्या भरावामुळे गावाना जलसमाधी मिळणार आहे, गावाचे काय होणार, याचे कोणालाही काही देणे घेणे नाही, याचे वाईट वाटते.
खूप छान सविस्तर बातमी
ReplyDelete