Wednesday, 28 January 2026

उरण मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत !!

उरण मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत !!

** ३४ उमेदवारांची माघार, ३९ उमेदवार रिंगणात.

** ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला फैसला; राजकीय रणधुमाळीला वेग

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी उरण तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.मंगळवारी ३४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता १२ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार आहेत.अर्ज माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार असून तालुक्यात राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे.३४ उमेदवारांनी अर्ज पाठीमागे घेतल्याने  निवडणूक लढविणाऱ्या इतर उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.


 जागांचे गणित आणि उमेदवारांची संख्या :- 

उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ अशा एकूण १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी सुरुवातीला २९ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १६ उमेदवार रिंगणात आहेत.

 पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ४६ अर्ज आले होते. त्यापैकी २ अर्ज बाद झाले आणि २१ उमेदवारांनी माघार घेतली. आता २३ उमेदवार मैदानात उरले आहेत.

उरणमध्ये ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट आणि अटीतटीची होणार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपकडून नगराध्यक्षपद खेचून घेतले होते. त्याच यशाची पुनरावृत्ती महाविकास आघाडी करणार की भाजप आपला गड राखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री शरदचंद्र पवार पक्ष ), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटक पक्षांचा समावेश आहे.उरण मध्ये खरी लढत ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक अटीतटीची झाली आहे.

अर्ज माघारीची प्रक्रिया आता पूर्ण झाल्याने आता प्रचारासाठी एक आठवडा शिल्लक आहे.गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतमोजणी शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.मंगळवारी सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पक्षांतर, बंडखोरी थोपवणे आणि सोयीचे राजकारण करण्यासाठी हालचालींना वेग आला होता. आता अंतिम उमेदवार निश्चित झाल्यामुळे आजपासूनच गावोगावी प्रचारसभा, पदयात्रा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे.उमेदवारांनी गावोगाव, गल्लो गल्ली पिंजून काढायला सुरवात केली आहे.उरण तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये कोणाची सत्ता येणार, कोण बाजी मारणार, याचा अंतिम निकाल ७ फेब्रुवारीला स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...