शरद पवारांनी अखेर भाकरी फिरविली, राष्ट्रवादीत दोन कार्यकारी अध्यक्षपदे, सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड !!
भिवंडी, दिं,१०, अरुण पाटील (कोपर) :
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीत दोन कार्यकारी अध्यक्षपदे ठेवण्यात आली असून खासदार सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे पवार यांनी जाहीर केले आहे. भाजपकडून अल्पसंख्यांकामध्ये दहशत निर्माण केली जात आहे. भाजकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. सत्ताधारी सत्ताधारी धर्मांधतेचा प्रचार करत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी भाषणात केली आहे.
सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय सर चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, गोवा राजस्थान व झारखंडची जबाबदारी पटेल यांच्याकडे सोपविली आहे. राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी पटेल यांच्याकडे सोपविली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पक्षसंघटना, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आत्मचरित्र प्रकाशनावेळी राजीनामा दिला होता. त्यानंतर कार्यकर्ता व नेत्यांवर पक्षाच्या नेत्यांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला होता. तेव्हा राष्ट्रवादीमध्ये कार्यकारी अध्यक्ष पदाची स्थापना होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, त्याबाबत शरद पवार यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.
अजित पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपविली जाईल, अशीही चर्चा होती. दुसरीकडे पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. तर आगामी निवडणुकीसाठी काम करण्याची सुप्रिया यांची इच्छा असल्याचे राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी म्हटले होते. मात्र, अचानक आज वर्धापनदिनालाच पक्षात मोठे बदल झाले आहेत. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार आदी नेते उपस्थित राहिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण होऊन पक्षाने 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे. राष्ट्रवादीचे नेते आज दिल्लीत वर्धापन दिन कार्यक्रमाला हजर आहेत. या कार्यक्रमात शरद पवार यांनी पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी वेगळी रणनीती आखल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी करण्यात आल्यानंतर पक्षाने राज्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजाविली आहे.
राष्ट्रीय काँग्रेसमधून सोनिया गांधींच्या इटालियन वंशाच्या मुद्यावरुन प्रश्न उपस्थित केल्याने शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना पक्षातून काढण्यात आले. त्यानंतर या तिन्हीं नेत्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. अत्यंत कमी कालावधीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इतिहासातील पहिला पक्ष ठरला आहे.
No comments:
Post a Comment