नँशनल हायवे कडून वनविभागाच्या अटी शर्तीचे उल्लंघन, तीनशे नऊ झाडांची कत्तल, म्हारळपाडा ते पाचवामैल पर्यंत परिसर उजाड !!
कल्याण, (संजय कांबळे) : राष्ट्रीय महामार्ग ठाणे विभागाला कल्याण तालुक्यातील मौजे म्हारळ ते पाचवामैल दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयाने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इजांयली व इतर जातींची झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. मात्र तोडलेल्या झाडाइतकीच झाडे आपण आपल्या मालकी क्षेत्रात २०२२ च्या पावसाळ्यात लावावी अशा व इतर ७ अटी शर्तीवर झाडे तोडण्याची परवानगी दिली असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाने मात्र याचे उल्लंघन केल्याचे समोर आले असून यामुळे म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान परिसर उजाड झाला आहे. त्यामुळे या अधिका-यार कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमी
करत आहेत.
कल्याण नगर या ६१ महामार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत होते. शिवाय वरप, टाटा पावर हाऊस, कांबा येथे रस्त्यावर पाणी भरत असल्याने हा महामार्ग ठप्प होत होता. त्यामुळे हा महामार्ग व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती. अखेरीस या महामार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले. करोडोंचे काम मिळूनही ठेकेदारच्या मनमानी व समन्वयाचा अभावामुळे हे काम रखडले. येथील सेक्रेट हार्ट स्कुलचे अलबिन सर यांनी या विरोधात तीव्र लढा उभारला होता. त्यामुळे काम मार्गी लागले.
या रस्त्याच्या दुतर्फा आंबा, जांभूळ, वड, चिंच, यासह इतर इजांयली जातीची ३०९ झाडे होती. त्याकाळच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीमती तृप्ती नाग मँडम यांनी ही झाडे तोडण्यासाठी कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयात परवानगी मागितली होती. ५ फेब्रुवारी २०२२ रोजी ही परवानगी वन विभागाने दिली. मात्र याकरिता ७ अटी शर्ती घालण्यात आल्या.यामध्ये जेवढी झाडे तोडतील तेवढीच झाडे लावावी लागतील अशा अटीसह महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियमन १९६४ (सुधारित) च्या कलम ३अ/१ अन्वये वृक्ष अधिकारी यास या जागेवर पुरेशी जाडे नाहीत असे वाटल्यास त्यांच्या आदेशानुसार झाडे लावावी लागतील यासाठी लागणारा खर्च संबंधित संस्थेकडून वसूल करुन झाडे तोडण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने, हत्यारे जप्त करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे. याबाबत चे हमीपत्र देखील घेण्यात आले असताना आता जून २०२३ उजाडला असून अद्यापही एकही झाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लावण्यात आले नाही व भविष्यात ही झाडे लावली जातील असे वाटत नाही. कारण रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधण्यात आले असून झाडे लावण्यासाठी अजिबात जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान कडक उन्हात सावलीत उभे राहण्यासाठी एकही झाड नाही हा विकास म्हणावा की भकास याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे वनविभागाच्या अटी शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या नँशनल हायवे अँथोरटी च्या अधिका-यावर कारवाई करावी अशी मागणी सेक्रेट हार्ट स्कुल चे अलबिन सर यांनी केली आहे.
प्रतिक्रिया __
*आर एन चन्ने (वनपरिक्षेत्र अधिकारी, कल्याण)
आमच्या विभागाकडून झाडे तोडण्याची परवानगी देतांना तेवढीच झाडे लावण्याची अटी घातल्या होत्या, त्याचे पालन करावे.
*अलबिन सर (व्यवस्थापक, सेक्रेट हार्ट स्कुल, वरप)
नँशनल हायवे अँथोरटी अधिका-यांचा आम्ही निषेध करतो, नुकताच जागतिक पर्यावरण दिन झाला तरी यांना जाग आली नाही, यांचेवर कारवाई व्हायला हवी.
No comments:
Post a Comment