Monday, 19 June 2023

सकल उलट चालले.....

सकल उलट चालले.....

सुमारे पन्नासेक वर्षांपूर्वी एक व्यंगचित्र मालिका दिवाळी अंकात आली होती. त्यातील कल्पना होत्या श्री पु ल देशपांडे यांच्या आणि ती चित्रे रेखाटली होती, व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडुलकर यांनी आणि त्याचे शीर्षक होते___

*'सकल उलट चालले*

आज ते शीर्षकच आठवतंय. कारण आज समाजाच्या परिस्थितीत मला समाजाचा उलटा प्रवास दिसतो आहे.
आमच्या प्राथमिक शाळेत आम्हाला एक धडा होता त्याचं नाव होतं 'गर्वाचे घर खाली'. त्याकाळी गर्व हा एक दुर्गुण समजला जात असे. त्या धड्यात मारुतीने भीमाचे गर्वहरण कसे केले याची कथा होती. थोडक्यात काय तर गर्व हा दुर्गुण समजला जात असे. आज मात्र सर्व प्रसार माध्यमे आणि सगळ्या ठिकाणी प्रत्येक जणच 'मी अमुक-तमुक असल्याचा मला गर्व आहे' असे बोलत असतो.  दुर्गुणाला सद्गुण ठरवण्याचा आजचा काळ. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते___

*'सकल उलट चालले'*

जरा मोठे झाल्यावर आमच्या हायस्कूलमध्ये काही गडबडगुंडा करणारी मुले, त्यांनी काही चुकीचे कृत्य केल्यास आमचे शिक्षक म्हणायचे "का रे,  माज चढला का तुला? दोन छड्या मारून तुझा सगळा माज उतरवून टाकेन".  म्हणजे  माज हा शब्द दुर्गुण समजला जात असे.  विशेषत: हा शब्द जनावरांसाठी वापरला जात असल्याने, माणसाला पशूच्या जागी कल्पून हे दुर्गुणात्मक विशेषण लावले जात असे.  परंतु आज कित्येक जण स्वतःचा उल्लेख करताना सुद्धा "मला अमुक-तमुक असल्याचा गर्वच नाही तर माज आहे"  असा उल्लेख अभिमानाने करतात म्हणूनच असे म्हणावेसे वाटते___

*'सकल उलट चालले'*

भाषे मधले अनेक गलिच्छ शब्द पूर्वी असभ्य समजले जायचे. परंतु सर्व असभ्य समजले जाणारे अनेक शब्द आज सर्रास प्रसिद्धी माध्यमांवर मोठमोठ्या सुशिक्षित सुजाण म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या तोंडी दिसतात. त्याच प्रमाणे अनेक प्रकारच्या सोशल मीडियावर विविध मजकूर पाहणारे लोक त्यांना न आवडणाऱ्या मजकुरावर अत्यंत गलिच्छ आणि अश्लील समजल्या जाणाऱ्या भाषेमध्ये स्वतःच्या कॉमेंट करताना आढळतात.  याला ट्रोलिंग करणे असे म्हणतात, असे म्हणे ! काही का असेना परंतु आमच्या काळी चार चौघात उच्चारणे जे असभ्य समजले जायचे तसे आता समजले जात नाही. ही समाजाची प्रगती ही पीछेहाट की दुर्दैव ?

आज आपण पाहतो आहोत आणि चर्चिलेही जाते की राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे.  परंतु समाजातील विविध प्रकारचे नेते म्हणून समजले जाणारे, त्याच प्रमाणे उद्याचे नेते म्हणून उल्लेख केले जाणारे किंवा गल्लोगल्ली नेत्यांच्या पोस्टरवर त्यांचे कार्यकर्ते म्हणून ज्यांचे फोटो मिरवले जातात, अशांची व्यवहारातली भाषा पाहिल्यास, आमच्या वेळी असभ्य शिवराळ समजली जाणारी भाषा सध्या सर्रास अनेकांच्या तोंडी दिसून येते. त्यामुळे हा समाजाचा प्रवास सभ्यते कडून असभ्यतेकडे चालला आहे असे म्हणावेसे वाटते.

एकूणच संपूर्ण समाजाचेच गुन्हेगारीकरण चालू आहे काय ?  असे विचारावेसे वाटते. 
किंबहुना भाषेचेही गुन्हेगारीकरण चालू आहे काय?  सर्वसामान्य माणसाच्या तोंडी गुन्हेगारांची भाषा ऐकू येते काय?  अशी शंका घ्यायला जागा आहे. 

हे समाजाचे स्वरूप असेच बिघडत जाणार आहे काय ? 
मग सुप्रसिद्ध कवी कै नामदेव ढसाळ यांच्या 'माणसाचे गाणे गावे माणसाने' या कवितेचा पूर्वार्ध सतत डोक्यामध्ये रुंजी घालायला लागतो. कै नामदेव ढसाळ यांच्या द्रष्टेपणाला सलाम करावा वाटतो. 

अर्थात त्यानंतर त्यांच्या कवितेचा उत्तरार्धही खरा ठरावा असे मनापासून वाटते.  मग आम्ही म्हणतो की नंतर तरी  माणसे गुन्हेगारी सोडून माणसाचेच गाणे गातील काय ?
आमच्या जिवंतपणी तरी ही वेळ येईल असे दृष्टीपथात येत नाही.  परंतु आमची मुले-नातवंडे तरी माणुसकीने वागवली जातील काय हाच प्रश्न मनाला कुरतडत असतो.

----- सुनील देशपांडे.
+91 96577 09640

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...