अंबरनाथ नगरपालिकेच्या डंम्पिगच्या गटाराचे पाणी कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत हद्दीत, पावसाळ्यात रोगराईची शक्यता ?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आदर्शवत आणि उदयोन्मुख ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आलेल्या 'जांभूळ, ग्रामपंचायत हद्दीत अंबरनाथ नगरपालिकेच्या डंम्पिगच्या गटाराचे पाणी सोडण्यचा प्रयत्न पालिकेने सुरू केला असून ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून रस्ता, गटाराचे बांधकाम देखील केले आहे. यामुळे पावसाळ्यात विविध साथीच्या आजाराला आमंत्रण मिळणार आहे. चांगल्या सुजलाम सुफलाम गावाचा सत्यानाश होणार असून यामुळे ग्रामस्थ भंयकर संतापले आहेत.
उल्हास नदीच्या काठावर जांभूळ गाव वसले आहे. शेतीप्रधान असलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात जमीन आहे. विविध शासकीय कार्यालय आहेत. याच मोकळ्या जमीनीवर अनेकांचा डोळा आहे. जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच परिक्षित पिसाळ यांनी उपसरपंच, सदस्य ग्रामस्थ यांच्या मदतीने गावाचा कार्यापालट केला आहे, आतापर्यंत अनेक शासकीय वरीष्ठ अधिका-यांनी या गावास भेटी दिल्या आहेत. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, दिवाबत्ती, रस्ते, शौचालये, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, स्वच्छता, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, आदी कोणतीच उणीव ठेवलेली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीस तालुका, जिल्हा स्थरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
ग्रामसेवक बाळू कोकणे तसेच इतरही आजी माजी ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, विस्तार अधिकारी, बीडिओ, सीईओ, तसेच आमदार, किसन कथोरे यांच्या सर्वांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे जांभूळ गाव जिल्ह्यात आदर्शवत ठरले आहे. असे असताना शेजारच्या अंबरनाथ नगरपालिकेने त्यांचे रस्ते, डंम्पिगचे गटारे, तेथे जाण्यासाठी रस्ता हा अतिक्रमण करून जांभूळ ग्रामपंचायत हद्दीत बांधला आहे.विशेष म्हणजे नगरपालिकेने आपली हद्द निश्चित करून ती दगडी बांधकाम करून पक्की बांधली असताना ती तोडून जांभूळ ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या सर्व्हे नं ४० मध्ये डंम्पिगचे गटार, भुयारी गटार, रस्ता विना परवानगी बांधली आहे.भुयारी गटार ओव्हर फ्लो झाल्यावर त्यावर निघणारा पाण्याचा निचरा हा जांभूळ च्या दिशेने सोडला आहे.त्यामुळे डंम्पिगमधील विषारी पदार्थ हे गावाच्या दिशेने येणार आहेत.
याशिवाय यांच्या बाजूला असलेल्या एका बिल्डर ने स्वतः ची जागा सोडून १५/२० फुट ग्रामपंचायत हद्दीत पत्रे लाऊन अतिक्रमण केले आहे. अंबरनाथ नगरपालिकेने अथवा कोणीही ग्रामपंचायत जांभूळ ची परवानगी अथवा साधा अर्ज पंचायतीकडे दिलेला नाही. त्यामुळे ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही असा इशारा सरपंच परिक्षित पिसाळ यांनी दिला आहे. याबाबतीत प्रतिक्रिया घेण्यासाठी नगरपालिकेचे सीईओ प्रशांत पिसाळ, अंबरनाथचे नायब तहसीलदार श्री जाधव, आदीना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
No comments:
Post a Comment