जय हनुमान क्रिकेट संघ बोरघर स्थानिक व मुंबईकर यांच्या माध्यमातून बोरघर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण...
बोरघर / माणगाव, ( विश्वास गायकवाड ) - रविवार दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा ते बारा या कालावधीत जय हनुमान क्रिकेट संघ स्थानिक व मुंबईकर नवतरुण मित्र मंडळ आणि बोरघर गावातील स्थानिक मान्यवर यांच्या माध्यमातून बोरघर- माणगाव या प्रमुख मार्गाच्या दुतर्फा विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे यांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण आणि मानवी जीवनात वनस्पती अर्थात झाडांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व ओळखून व भविष्याचा वेध घेऊन जय हनुमान क्रिकेट संघ बोरघर स्थानिक आणि मुंबईकर यांच्या झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमांतर्गत या वर्षी बोरघर गावातून माणगाव कडे जाणाऱ्या प्रमुख मार्गाच्या दुतर्फा अर्थात दोन्ही बाजूला शेकडो प्रजातीच्या आंबा, काजू, पेरु, बहावा, फुलझाडे, फळझाडे व अन्य औषधी वनस्पती यांच्या रोपांचे यथायोग्य पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वृक्षारोपण करण्यासाठी जय हनुमान क्रिकेट संघाचे मुंबई स्थित सर्व पदाधिकारी मुंबई हून आपापल्या नोकरी धंद्यातून एकदिवसीय सुट्टी घेऊन आवर्जून गावाला आले होते. विषेशतः या वर्षी रविवारी १६ जुलै रोजी गटारी सण आला होता. कोकणातील जनता गटारी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी प्रत्येक घराघरात मटण वडे बनवले जातात असा सण असून सुद्धा त्या सणाला जास्त महत्त्व न देता वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. असा दृष्टीकोन ठेवून जय हनुमान क्रिकेट संघाने ऐन गटारी च्या दिवशी वृक्षारोपण करून सर्वांसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
जय हनुमान क्रिकेट संघाच्या ''झाडे लावा झाडे जगवा '' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात प्रामुख्याने पेण तळे ग्रामपंचायत सरपंच रसिका कळंबे मॅडम, सदस्य संतोष कळंबे, पोलीस पाटील विजय कळंबे, नारायण मांगले, सुरेश मांगले, समीर साखरे, अनिल मांगले, अजय वाघरे, अमोल मांगले, श्रीराम कळंबे, संजय सुतार, अविनाश दळवी, मनिष कालप, प्रवीण मोरे, अनिल शिंदे, विकास मोहे, अशोक काशिम, अतिश मांगले, सहदेव रेवाळे, अनिकेत कळंबे, स्वागत वाघरे, कुणाल जाधव, निखिल सुतार, वैभव सुतार, हर्ष दिवेकर, उमेश कालप, नानू दिवकरे, रमेश जाधव, सखाराम गायकवाड, पत्रकार विश्वास गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
No comments:
Post a Comment