शहराच्या स्वच्छतेसाठी व सौंदर्यीकरणामध्ये नागरिकांनी देखील आपले योगदान द्यावे - महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे
कल्याण , नारायण सुरोशी : शहराच्या स्वच्छतेसाठी व सौंदर्यीकरणामध्ये नागरिकांनी देखील आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने आणि विद्युत ठेकेदारांच्या सहकार्याने कल्याण पश्चिमेकडील अल्टीजा- डी मार्ट चौक - अग्रवाल कॉलेजपर्यंतच्या भिंतीवर आकर्षक चित्रे रंगविण्याच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांचे प्रमुख उपस्थितीत आज झाला त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
महापालिकेने दीपावलीनिमित्त विशेष स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. महापालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, इतर सेवाभावी संस्था यात मोलाचे योगदान देत आहेत. या उपक्रमांतर्गतच शहर सौंदर्यीकरणातून ह्या भिंती रंगविण्याचे काम हाती घेत असल्याची माहिती महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. त्याचप्रमाणे नागरिकांना दीपावली निमित्त शुभेच्छा देत, नागरिकांनी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी, एकल प्लास्टिकचा वापर टाळावा आणि ध्वनी व वायू प्रदूषण करणारे फटाके वाजवू नयेत असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
या समयी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, डॉ.अश्विन कक्कर, माहिती व जनसंपर्क विभागाचे विभाग प्रमुख संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहा. आयुक्त सुषमा मांडगे,ब प्रभागाचे सहा .आयुक्त राजेश सावंत, माजी नगरसेवक सुनील वायले तसेच अनेक नागरिक ,महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमात सुमारे 6000 स्क्वेअर फुट भिंत जे जे स्कूल ऑफ आर्ट च्या विद्यार्थ्यांमार्फत आकर्षित आकर्षक रित्या रंगविली जाणार आहे, यामुळे शहर स्वच्छतेबाबत व महापालिकेच्या शहर सौंदर्यकरण उपक्रमाबाबत नागरिकांचा दृष्टिकोन सकारात्मक होण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment