दिपावलीतील लक्ष्मी पुजनाच्या अगोदरच बळीराजाची लक्ष्मी रुसली, ऐन दिवाळीत कल्याणातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !!
कल्याण, (संजय कांबळे) : दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, असे दिपावली सणाच्या बाबतीत म्हटलं जातं. मात्र याच सणातील अंत्यंत महत्त्वाचे लक्ष्मी पूजन असते, परंतु कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वर यंदा लक्ष्मी रुसली आहे, असेच वाटते, कारण सलग दोन दिवस आलेल्या मुसळधार वादळी अवकाळी पावसाने बळीराजाचे पिवळे सोन या पाण्यात भिजून कुजू लागले आहे . ह्रदय हेलावून टाकणारे हे चित्र पाहून या भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येवू लागले आहे.
कल्याण तालुक्यात ५ ते ६ हजार हेक्टर भात पिकांचे क्षेत्र आहे, यावर्षी पाऊस चांगला व वेळेवर पडल्याने भात पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती, तालुक्यातील पिंपळोली गावचे शेतकरी कृष्णा बाबू मिरकुटे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर लोकनाथ ५००, एककाडी या जातीच्या भात पिकाची लागवड केली होती.सुदैवाने पिक देखील चांगले आले आहे. दसऱ्या नंतर मजुर घेऊन भात कापणी केली व भात शेतातच ठेवले, मजुरांची दिवाळी असल्याने ते गावी गेले व दिपावली नंतर भात घरी आणायचे असे ठरले तोपर्यंत काल व परवा सांयकाळच्या सुमारास तूफान वादळी अवकाळी पाऊस पडला, शेतात इतके पाणी साचले की कापलेले भात पाण्यात भिजून तंरगत होते.
पाऊस थोडा बंद झाल्यानंतर शेतकरी कृष्णा मिरकुटे व त्यांचे कुंटूबीय शेताकडे धावले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला, काळ्या मातीतून अगदी तरारुन आलेले पिवळे सोन मातीमोल झालं होतं.अशीच परिस्थिती दहागाव, चौरे, मामणोली, आपटी, मांजर्ली येथील ३०/४० शेतकऱ्यांची झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान कल्याण तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी अनेक गावाची पाहणी केली असून विमा कंपन्या चे लोक देखील गावोगावी भेटी देत आहेत असे समजते. शेतातील भिजलेले भात बघून आता माझी जगण्याची इच्छा नसल्याचे पिंपळोली गावचे शेतकरी कृष्णा मिरकुटे यांनी बोलून दाखवले, त्यामुळे संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह असताना, सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले असताना कल्याण तालुक्यातील बळीराजाच्या डोळ्यात मात्र पाणी आले आहे.
No comments:
Post a Comment