दोन लाख रुपये लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी व एक खाजगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात !!
भिवंडी, दिं,२१,अरुण पाटील (कोपर)
परवानगी पेक्षा जास्त खोदकाम करत असल्याचा खोटा अहवाल वरिष्ठ कार्यालयास न पाठवण्यासाठी १० लाख रुपये लाच मागितली. त्या पैकी दोन लाख रुपये पहिला हप्ता स्वीकारताना ठाणे तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.२० ) करण्यात आली.
मंडळ अधिकारी महेंद्र गजानन पाटील, (वय-५१), खासगी इसम वाजीद मेहबुब मलक (वय-६३) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका व्यक्तीने ठाणे एसीबी कार्यलयात तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे रेमंड कंपनी ठाणे येथे साईट चालु आहे. साईटवर खोदकाम करण्यासाठी मिळालेल्या परवानगी पेक्षा जास्त खोदकाम करत आहेत. असा खोटा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयास न पाठवण्यासाठी महेंद्र पाटील याने तक्रारदार याच्याकडे सोमवारी (दि.१८) दहा लाख रुपये लाच मागितली. तडजोडी अंती ६ लाख रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुपत प्रतिबंध विभाग -- ठाणे ( एसीबी ) कार्यालयात मंडळ अधिकारी महेंद्र पाटील लाच मागत असल्याची तक्रार केली. प्राप्त तक्रारीची एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता महेंद्र पाटील याने दहा लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती सहा लाख रुपये स्वीकारण्यास संमती दिली. ठरलेल्या ६ लाख रुपयांपैकी २ लाख रुपयांचा पहिला हप्ता बुधवारी तर उर्वरित ४ लाखांचा दुसरा हप्ता शनिवारी (दि. २३ डिसेंबर) स्वीकारण्याचे पाटील यांनी मान्य केले.
ठाणे एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि.२०) सापळा रचला.महेंद्र पाटील याने तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपये पहिला हप्ता स्वीकारुन रक्कम खासगी इसम वाजीद मलक याच्याकडे दिली असता पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले.आरोपींवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे युनिटचे पोलीस निरीक्षक नितीन थोरात यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment