जीवन मरणाच्या दारातील रुग्णाला निलेश सांबरे यांच्या जिजाऊने दिले जीवदान !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी कसे प्रसंग येतात की जिथे सगळी उमेद संपते माणूस अक्षरशः हतबल होतो आणि सारे काही नियतीच्या अथवा देवाच्या भरोवश्यावर सोडून देतो. मग अश्या परिस्थितीत कधीतरी चमत्कार घडावा अश्या काही घटना घडतात आणि आपल्याला त्यावेळी मदत करणारी माणसे देवदूत वाटतात. असाच काहीसा प्रसंग घडला आहे विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे असलेल्या निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या श्री.भगवान महादेव सांबरे रुग्णालयात, येथील डहाणू तालुक्यातील रणकोल येथील ५५ वर्षीय, राजी आहाडी यांच्या पोटात असलेली ६ किलोची कॅन्सरची गाठ एका किचकट आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढून या रुग्णाला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढून श्री.भगवान महादेव सांबरे रुग्णालयातील डॉक्टरांनी इतिहास रचला आहे. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक हे जेव्हा जेव्हा डॉक्टरांच्या समोर येतात तेव्हा तेव्हा “डॉक्टर तुम्ही देवासारखे आम्हाला भेटलात आणि आमचा माणूस वाचवलात.... खरंच निलेश सांबरे सारख्या देव माणसाच्या दारात आमचा माणूस आला आणि तो वाचला.” अश्या प्रतिक्रिया पाणवलेल्या डोळ्यांनी देत आहेत.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल भाग आहे. ठाण्यापासून हा स्वतंत्र जिल्हा विभाजन होवून आज ९ वर्ष झाली मुख्य प्रवाहापासून, मुलभूत सुविधांपासून अनेक वर्ष इथला आदीवासी बांधव आजही वंचित आहे. जन्मताच ( कुपोषणाने ) दररोज किमान ३ बालके कुपोषणाने झाडाची पानगळ व्हावी तशी कोवळी बालके मृत्युमुखी पडतात. तर शेकडो लोकांना उपचारासाठी पैसे नसल्याने व आपल्या जिल्ह्यात रूग्णालय नसल्याने मृत्युला सामोरे जावे लागते. ही भयावह परिस्थिती पाहून समाजिक भान असलेली निलेश सांबरे सारखी व्यक्ती आतून हादरून जायची. मात्र केवळ हळहळ व्यक्त न करता आपल्या या समाज बांधवांसाठी ते उभे राहिले आणि केवळ पैसे नाहीत म्हणून उपचराअभावी इथला कुठलाही माणूस दागवणार नाही असा दृढ निश्चय करून त्यांनी आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जिथे विजेची समस्या आहे , जिथे धड रस्ते नसल्याने प्रवासाची नीट सुविधा नाही. अश्या अति दुर्गम भागात लहानश्या झडपोलीसारख्या १५० – २०० लोकवस्तीच्या खेड्यात आपल्या वडिलांच्या नावाने श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालय अगदी मोफत सुरु केले .
आज या ठिकाणी १३० बेडसची क्षमता आहे. झडपोली गावात असलेले जिजाऊ संस्थेचे हे रुग्णालय ठाणे पालघर विभागातील गोर गरीबांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. एखाद्या मोठ्या शहरातल्या मल्टीस्पेशालीस्ट रुग्णालयाला लाजवेल असे १३० बेडसचे रुग्णालय या ठिकाणी २४ तास विनामुल्य चालवले जात आहे. अगदी सर्दी खोकल्या पासून कॅन्सर पर्यंतचे उपचार या ठिकाणी अगदी मोफत केले जातात . आजवर लाखो रुग्णांना या रुग्णालयाचा लाभ झाला आहे. पालघरच नव्हे तर ठाणे कल्याण शहरातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येत असतात .
या रुग्णालयातील डॉ. प्रशांत पाटील यांनी माहिती देताना सांगितले की कॅन्सरचे रुग्ण असलेल्या राजी आहाडी हे आमच्या श्री .भगवान महादेव सांबरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याआधी अडीच ते तीन महिने इतर रुग्णालयात फिरत होते. यावेळी त्यांच्या पोटात असलेली ६ किलोची कॅन्सरची गाठ काढण्यासाठी लागणाऱ्या उपचाराचा खर्च त्याना लाखोंच्या घरात सांगण्यात आला होता. रूग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच असल्याने हा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. तसेच ही शस्त्रक्रिया देखील जोखमीची होती. यात पेशंटचा जीव जाण्याची शक्यता जास्त होती.
अश्या परिस्थिती गोर गरीबांसाठी आधारवड ठरलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती मिळाली येथील दाभोळ गावात कार्यरत असलेले संस्थेचे स्वयंसेवकांच्या मार्फत त्यांना विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयात रुग्णाला उपचारासाठी दखल करण्यात आले. शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे होते. त्या आधी सर्व तपासण्या करण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची होती. ऑपरेशन करत असताना रुग्णाच्या हृदयाची गती ही सामान्यता ६५ % असणे गरजेचे असते मात्र या रुग्णांच्या हृदयाची गती ही ३५% होती. त्यामुळे ऑपरेशन दरम्यान पेशंट दगावण्याची शक्यता जास्त होती. अश्या वेळी त्यासाठी लागणारे विशेष औषधांची तजवीज संस्थेच्यावतीने करत येथील सर्जन मकरंद भोळे यांनी आणि त्यांच्या टीमने साडेतीन तासांच्या अथक परिश्रमानंतर यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पार पाडली.
महाराष्ट्रातील पहिल्या १० मोठ्या रुग्णालयात अश्या प्रकारच्या कठीण शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत त्यांनतर आता जिजाऊ संस्थेच्या श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे आणि ती ही रुग्णाकडून कसलीही फी न घेता मोफत पार पाडल्याने सर्वत्रच या रुग्णालयाचे आणि जिजाऊ संस्थेचे कौतुक होत आहे. एकीकडे जिथे अनेक ठिकाणी रुग्णसेवा, रुग्णालय ही खोऱ्याने पैसे कमावण्याचे साधन झालेले असताना दुसरीकडे मात्र जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी चालू केलेले हे २४ विनामुल्य रुग्णसेवा देणारे रुग्णालय हे एक असामान्य उदाहरण ठरत आहे .
शेती आणि भाजीपाला विकून कसाबसा आपला उदर निर्वाह करणाऱ्या या कुटुंबाने जिजाऊ संस्था रुग्णालयातील डॉक्टर त्यांची टीम आणि विशेष करून संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
तर याबद्दल बोलताना संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे म्हणाले की “ इथला प्रत्येक माणूस हा आपल्या घरातील माणूस आहे तो वाचला पाहिजे पैसे नाहीत म्हणून उपचाराअभावी जीव जाणार नाही यासाठी जिजाऊ संस्था नेहमीच आपल्या परीने शक्य तेवढे सहकार्य आणि प्रयत्न करते आणि मी या समाजाचा घटक म्हणून माझे ते कर्तव्य आहे असे मी मानतो”..असे समाजसेवक नीलेशाजी सांबरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment