एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही राज्यातील जनतेचीच इच्छा - आमदार विश्वनाथ भोईर यांची भावना
कल्याण, सचिन बुटाला, दि.27 नोव्हेंबर :
राज्यामध्ये महायुती निवडून येण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मिळावे अशी राज्यातील जनतेचीच इच्छा असल्याची भावना कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या सस्पेन्सबाबत प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना भोईर यांनी ही भावना व्यक्त केली.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून येण्यामागे या शासनाचे, महायुतीचे काम किंवा सरकारने जे निर्णय घेतले, ज्या योजना राबवल्या होत्या त्याचा एकत्रीत परिणाम आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत असल्याचे विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा शासनाने राबवलेल्या योजनांपैकी सर्वात महत्वाची योजना लाडकी बहीण योजना आहे. पूर्ण महाराष्ट्रात ही योजना उचलून धरली गेली राज्यातील लाडक्या बहिणींनी आपल्या भावाच्या पारड्यात भरघोस मतदान टाकले. महायुती भरघोस मतांनी निवडून येण्यामागे लाडकी बहीण योजनेचाही मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची, लाडक्या बहिणींसह शेतकरी, कामगार, कष्टकरी, युवक आणि जेष्ठ नागरिक अशा समाजातील सर्वच घटकांची हीच इच्छा आहे की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच व्हावे. जेणेकरून महाराष्ट्राचा गाडा सुरळीतपणे चालेल आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे अशी आपल्यासह सर्वांची इच्छा असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment