बुध्दीप्रामाण्यवादी पत्रकारितेचा दीपस्तंभ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे, ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून!जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. असे जरी असले तरी,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. धर्मशास्त्र, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक, द्रष्टे विचारवंत, विविध सामाजिक चळवळींचे जनक याबरोबरच त्यांनी केलेली पत्रकारिता आजही प्रेरक ठरेल अशीच आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकारांची ओळख घटनाकार, घटनातज्ञ, कायदेपंडित, अर्थतज्ञ अशा अनेक अंगांनी जगाला परिचित आहे, परंतु पत्रकार डॉ.आंबेडकर म्हणून अद्यापही वृत्तपत्रसृष्टीने बाबासाहेबांची म्हणावी तेवढी दखल घेतल्याचे दिसून येत नाही.वास्तविक पाहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही काही प्रचारकी पत्रकारिता नव्हती, तर तिला समाजोद्धाराचे पर्यायाने राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान लाभलेले होते. डॉ.बाबासाहेबांनी मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०) आणि प्रबुद्ध भारत (१९५६) या नावांनी पाक्षिके चालविली. यापैकी जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत:न करता सहकार्यांकडून करून घेतले. मात्र 'मूकनायक' आण 'बहिष्कृत भारत' या दोन्ही पत्रांचे संपादन मात्र त्यांना स्वत:लाच करावे लागले. बहिष्कृत भारताच्या संपादनात बाबासाहेब स्वत: ओळ न ओळीकडे लक्ष देत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची सांपत्तिक स्थिती नव्हती तसेच बिनमोली संपादकी काम करण्यास स्वार्थ्यत्यागी असा माणूसही लाभला नाही. बहिष्कृत भारताच्या संपादकाच्या प्रौढ लिखाणास दबून गेल्याने म्हणा किंवा सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे म्हणा, बाहेरच्या लोकांचा त्यास मिळावा तितका पाठिंबा मिळाला नाही. अशा स्थतीत बहिष्कृत भारताचे २४-२४ रकाने लिहून काढण्याची सारी जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली. थोडक्यात बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी मूकनायक आणि बहिष्कृतभारत ही पत्रे त्यासाठी आधारभूत आहेत. या पत्रांमधून डॉ.आंबेडकरांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते.मूकनायक' च्या सुरवातीलाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या या ओळीतून त्यांची भूमिका स्पष्ट होते.
काय करूं आता धरूनिया भीड |
नि:शंक हे तोंड वाजविले |
नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण |
सार्थक लाजून नव्हें हित |
मूकनायकाने त्याकाळी सर्वार्थाने मुक्या असलेल्या समाजाला खर्या अर्थाने आवाज दिला. त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश दिसून येतात. पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरा म्हणजे समाज सुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता मात्र यापेक्षा वेगळी म्हणजेच संपूर्ण मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरपांगी समाज सुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते याच देशात माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, यासाठी तोंडातून शब्दसुद्धा काढायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत दुसर्या बाजूला माणसाला माणूसकीचे निसर्गदत्त हक्क मिळवून देण्याचा, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांच्या पत्रातून केला जात होता. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला मूकनायकच्या रूपाने नवा आवाज मिळाला.त्यातून बाबासाहेबांच्या लेखणीचे अनेक पैलूही स्पष्ट होतात. बाबासाहेबांची पत्रकारिता जशी आक्रमक, तितकीच संयमी होती.त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांच्या प्रचंड विद्धत्तेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही.मूकनायकमधील बाबासाहेबांचे लेख प्रचंड कोटीचे तत्वज्ञान होते. पत्रकारितेसाठी आवश्यक असणारी अत्युच्च दर्जाची पात्रता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. उच्च कोटीचे तत्त्वज्ञान, प्रकांड पांडित्य, गाढा अभ्यास, समुद्राचा ठाव घेणारी विश्लेषण क्षमता याचबरोबर भाषिक सौंदर्याचे उत्तुंग दर्शन त्यांच्या पत्रांमधून होते. तत्कालीन परिस्थितीत फक्त आपल्या चळवळीची मुखपत्रे म्हणून ही वृत्तपत्रे चालविली नाही तर एकूण जागतिक घडामोडींचा आढावादेखील त्यातून व्यक्त होत होता. उच्च शिक्षणासाठी लंडनला जाताना त्यांनी 'मूकनायक' ची जबाबदारी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे सोपवली. तरीही विदेशातून बातम्या, लेख व इतर माहिती ते स्वत:पाठवीत असत. बाबासाहेब शिक्षण संपवून परत येईपर्यंत मात्र ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आणि काही इतर कारणांमुळे मूकनायक बंद पडले. त्याचे त्यांना अतीव दु:ख झाले.कोणत्याही चळवळीत वृत्तपत्राचे योगदान काय असते, याची बाबासाहेबांना पूर्ण जाणीव होती. म्हणून पुन्हा जुळवाजुळव करून 'बहिष्कृत भारत'च्या रूपाने त्यांचे नवे पाक्षिक उदयाला आले. तो दिवस होता ३ एप्रिल १९७२.या पाक्षिकाच्या मांडणीतून बाबासाहेबांची पत्रकारिता सर्वार्थाने अगदीच प्रगल्भ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रातील मजकूर, मांडणी, सदरे अगदीच अप्रतिम होती. या पाक्षिकामध्ये मुख्यत: 'आजकालचे प्रश्न' नावाने चालू घडामोडींविषयीचे सदर, अग्रलेख, 'आत्मवृत्त', 'विचार-विनिमय',' वर्तमान सार' याबरोबरच 'विविध विचारसंग्रह' अशी अनेक सदरे नियमितपणे सुरू होती. 'बहिष्कृत भारत' सुरू झाले त्याचवेळी महाड येथील धर्मसंगरालाही सुरवात झालेली होती. त्यामुळेच या काळात या पत्राने चळवळीसाठी अतिशय अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात मोलाची भर घातल्याचे दिसून येते. या पत्रातूनदेखील बाबासाहेबांचे भाषावैभव अत्यंत खुलून दिसते. उदाहरण म्हणून लोकभाषेत त्यांनी दिलेली काही लेखांची शीर्षके पाहता येतील.आरसा आहे, नाक असेल तर तोंड पाहून घ्या !', 'खोट्याच्या साक्षीने खरे सिद्ध होते काय?', 'आपलेपणाची साक्ष दे, नाहीतर पाणी सोड', 'गुण श्रेष्ठ की जात श्रेष्ठ', 'बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय?', 'खरे बोल निश्चयात आहे, समुच्चयात नाही' अशा प्रकारच्या लेखांमधून बहिष्कृत भारताने अक्षरश: रान पेटवले. एकूणच डॉ.बाबासाहेब आबेडकरांची पत्रकारिता ही त्यावेळच्या इतर पत्रकारांपेक्षा अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारी म्हणूनच भिन्न स्वरूपाची होती. सध्याच्या पत्रकारितेने डॉ.आंबेडकरांच्या पत्रकारितेकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
६ डिसेंबर, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांच्या विचारांची मशाल घेऊनच पुढे चालण्याचा संकल्प करुया.त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.!
केतन दत्ताराम भोज
कार्यकारिणी सदस्य - मराठी वृत्तपत्र लेखक संघ,मुंबई
भ्रमणध्वनी - ८३६९५५४४१८
No comments:
Post a Comment