शेलघरचे तुकाराम नारायण घरत यांची अकरावी पुण्यतिथी साजरी !!
** वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महेंद्रशेठ घरत यांची जासई हायस्कूलला दहा संगणकांची भेट
उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांचे वडील दिवंगत तुकाराम नारायण घरत यांची अकरावी पुण्यतिथी बुधवारी साजरी करण्यात आली. तुकाराम नारायण घरत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हिरीरीने सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना तुरुंगातही जावे लागले, परंतु ते मागे हटले नाहीत. त्यांनी त्याकाळी शैक्षणिक, सामाजिक चळवळ राबवली. तोच वसा आज महेंद्रशेठ घरत यांनी घेतला असून सामाजिक कार्यात त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त महेंद्रशेठ घरत यांनी जासई हायस्कूलला दहा संगणकांची भेट देऊन आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. हा कार्यक्रम उलवे नोड मधील 'भूमिपुत्र भवन'मध्ये झाला.
यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, "महेंद्रशेठ यांनी आपल्या वडिलांचा वारसा उत्तमरित्या चालविला आहे. दिवंगत ज. आ. भगत यांची प्रेरणा घेऊन तो सर्वच क्षेत्रांत धडाडीने काम करतोय. वडिलांच्या नावे ज्युनियर महाविद्यालय, तर आईच्या नावाने यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था सुरू करून गोरगरिबांसाठी शैक्षणिक कार्य त्याने जोमाने सुरू ठेवले आहे. त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आम्ही निवडणुकीपुरते राजकारण करतो, बाकी आमच्या मैत्रीत बाधा येणार नाही, याची काळजी आम्ही घेतो."
यावेळी 'पैशाने तुटली नाती' हे नाटक सादर करण्यात आले. आगरी बोली भाषेतील हे नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले. खचाखच भरलेल्या 'भूमिपुत्र भवन'मध्ये रसिकांच्या टाळ्यांनी कलाकारांची मने जिंकली. भूमिपुत्र भवनमध्ये 'पैशाने तुटली नाती' हे पहिल्यांदाच नाटक सादर करण्यात आले. त्यामुळे कलाकार, रसिक यांच्या प्रेमाला भरते आले होते.
दिवंगत तुकाराम नारायण घरत यांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर, उरण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, दिबांचे पुत्र अतुल पाटील, महेंद्रशेठ यांचे सासरेबुवा रामशेठ म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, माजी सरपंच वसंत म्हात्रे, साई मंदिरचे अध्यक्ष रविशेठ पाटील आदी शेकडो मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या गव्हाण येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि खारकोपर येथील दिवंगत तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेजमध्येही पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
No comments:
Post a Comment