प्रजासत्ताक दिनाची पूर्व संध्या....नमन लोककलेचा त्रिवेणी संगम !!
मुंबई प्रतिनीधी( दिपक वेलुंडे)
रविवार २५ जानेवारी, २०२६ रोजी साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे कुणबीवाडी विकास मंडळ, असोरे (रजि.) मंडळाच्या वतीने पारंपरिक कोकणची लोककलेचा "नमन" कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंडळाच्या अंतर्गत श्री. चंडिका कलापथक, असोरे यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून तब्बल चार दशकांपासून जपली गेलेली नमन कला प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आली.
कोकणचे खेळे व नमन हा पारंपरिक बाज कायम राखत "भक्तिमय गण, स्त्री पात्रांनी नटलेली गवळण, पौराणिक वगनाट्य - सत्यवान सावित्री" सादरीकरण करण्यात आले. विशेषतः गवळणींची अर्थपूर्ण लोकगीते तसेच प्रणाली थोरसे गायिकेचा मधुर आणि लयबद्ध आवाज तसेच नजरेला भावणारे नृत्याविष्कार यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली. लोककलेचा रुपबंध जपत आधुनिक सादरीकरणाची जोड देण्यात आली, ही बाब रसिक प्रेक्षकांच्या मनाला विशेष भावली.
रविवार, प्रयोगाच्या निमित्ताने ही पारंपरिक कला नव्या पिढीकडे संक्रमित होताना स्पष्टपणे दिसून आली. जेष्ठ पिढी, तरुण पिढी आणि बाल पिढी असा त्रिवेणी संगम एकाच मंचावर अप्रतिम पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील सर्व कलाकार हे गावातीलच होते, ही बाब अभिमानास्पद ठरली.
कार्यक्रमातील सर्व कलाकार उच्चशिक्षित असूनही लोककलेची परंपरा जोपासत आहेत हे विशेष कौतुकास्पद आहे. शिक्षण आणि संस्कृती यांचा सुंदर समन्वय या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक करत लोककलेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
एकूणच हा नमन कार्यक्रम परंपरा, संस्कृती आणि नव्या पिढीची ऊर्जा यांचा सुंदर संगम ठरला असून, कोकणच्या लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.
No comments:
Post a Comment