मोठीजुई शाळेत विद्यार्थ्यांनी केले परसबागेतुन 'पक्षीनिरीक्षण' !
उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : निसर्गाबद्दल प्रेम आणि कुतूहल जागृत करण्याच्या उद्देशाने उरण तालुक्यातील मोठीजुई येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनोख्या 'पक्षीनिरीक्षण' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या स्वतःच्या परसबागेत राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर पडून निसर्गाचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिक्षकांच्या पुढाकाराने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. शाळेची परसबाग विविध प्रकारच्या भाज्या, फळे आणि फुलांनी बहरलेली असल्यामुळे तिथे अनेक स्थानिक पक्ष्यांचा वावर असतो. याच नैसर्गिक वातावरणाचा फायदा घेत, विद्यार्थ्यांना सकाळी लवकर शाळेच्या बागेत जमण्यास सांगण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी दुर्बिणीतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शांत राहून पक्ष्यांच्या हालचाली कशा टिपायच्या, याची माहिती दिली. या निरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने चिमण्या, कावळे, पोपट,साळुंक्या, लाल बुडाचा बुलबुल, भारद्वाज, खाटिक,वटवट्या,व्हला,कबुतर, आणि काही फुलचुख्यांचा (सनबर्डस) समावेश होता. विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे रंगरूप, आवाज आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींचे बारकाईने निरीक्षण केले. काही विद्यार्थ्यांनी तर त्यांच्या निरीक्षणांची नोंद वहीत करून ठेवली. "केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता," असे शाळेचे उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर यांनी सांगितले. "परसबाग हे यासाठी उत्तम ठिकाण ठरले, कारण तिथे सहजपणे अनेक पक्षी आकर्षित होतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि संवेदनशीलता वाढीस लागते." या यशस्वी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी अधिक गोडी निर्माण झाली असून, भविष्यात असे आणखी उपक्रम राबवण्याचा मानस शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी अविनाश नवाले, कौशिक ठाकूर, विश्वनाथ गावंड, यतीन म्हात्रे, दर्शन पाटील, अंकुश पाटील, काजल पाटील यांनी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment