Thursday, 12 March 2026

"पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालय"च्या नुतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी मंजूर - मा. संजय शिरसाठ

"पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालय"च्या नुतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी मंजूर - मा. संजय शिरसाठ 

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय श्री संजयजी शिरसाठ साहेबांनी आज दि. ११/३/२०२६ रोजी सायंकाळी ३.०० वाजता भेट दिली. मागिल वर्षी दि. ८ जूलै,२०२५ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या ८०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले साहेब, महामहीम‌ राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन तसेच उच्च‌ व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री. संजयजी शिरसाठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यावेळी सन्माननीय शिरसाठ साहेबांनी संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालये व वसतिगृहाच्या नुतनीकरण, पुनर्बांधणी व विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सेवा मिळाव्यात या हेतूने शासनाकडून ५०० कोटी मिळवून देण्याचे  जाहीर केले होते, त्याचा त्यांनी प्रामाणिकपणे पाठपूरावा करून  अलिकडेच मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये सदर ५०० कोटी पिईएस सोसायटीच्या १२ महाविद्यालये व वससतीगृहासाठी मंजूर करून घेतले. यामध्ये आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयासाठी ४२ कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. लवकरच प्रत्येक महाविद्यालयाचे प्राचार्य व वरिष्ठ प्राध्यापकांनी समाजकल्याण सचिव व PWD चे अभियंतासोबत मिटींग करून कशा प्रकारे नुतनीकरण करावे व कोणकोणत्या मुलभूत शैक्षणिक सुविधा असाव्यात त्याचा आराखडा तयार करून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत.

सन्माननीय शिरसाठ साहेबांच्या स्वागतासाठी व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कॉलेजच्या सभागृहात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी कॉलेजच्या गेटवर त्यांचे आगमन होताच फटाके फोडण्यात आले व वाजत गाजत त्यांचे जंगी स्वागत आजी- माजी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले. त्यांनतर दुसऱ्या मजल्यावरील सभागृहातील नियोजित कार्यक्रमात सर्वप्रथम त्यांचा सत्कार माजी प्राचार्य डॉ. उमाजी मस्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन केला. 

त्यांनतर कार्यक्रमाच्या प्रस्तावनेद्वारे प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णू भंडारे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची थोडक्यात माहिती सादर दिली. तळागाळातील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी सहज मिळावी या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५३ साली या महाविद्यालयासह इतरही महाविद्यालयांची स्थापना केली होती. या ठिकाणी ३५००-४००० विद्यार्थी प्रत्येक वर्षी शिक्षण घेत असतात, यामध्ये कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालयात अनुदानित व विनाअनुदानित ६ प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनाच्या नविन शैक्षणिक धोरणानुसार या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारीत शिक्षण देण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा व त्यासाठीचे पायाभूत सुविधा  उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उदा. स्मार्ट क्लासरूमस, संगणक व कम्युनिकेशन प्रयोगशाळा, सेमिनार हॉल इत्यादी. यामुळे विद्यार्थ्यांना पदवी सोबत कमी फी मध्ये अल्प कालावधीचे जॉब ओरिएंटेड कौशल्य विकास आधारीत कोर्सेस देता येतील, परिणामी आमचे विद्यार्थी भविष्यात सुशिक्षित बेरोजगार राहणार नाहीत. प्राप्त परिस्थितीत अशा शैक्षणिक आव्हानांना आम्ही सामोरे जात असताना शासनाकडून मिळत असलेली मदत आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार मोलाची ठरणार आहे, असा प्रामाणिक आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

माननीय शिरसाठ साहेबांनी त्यांच्या भाषणातून ते पिईएसच्या मिलिंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा आवर्जून उल्लेख केला व त्यामुळे त्यांनी कर्तव्य भावनेने ५०० कोटी शासनाकडून देण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात कृतीत उतरवली. तसेच सदर रक्कम मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये सर्व सहमतीने मंजूर होऊन शासनाकडून तसा जी आर देखील निघालेला आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात पिईएसच्या महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालये आधुनिक तंत्रज्ञान व सेवा सुविधांनी अद्ययावत व्हावीत यासाठी शासनाकडून नियमीतपणे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले. मात्र, पिईएसच्या  व्यवस्थापनाचा वाद लवकरच संपुष्टात यावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आटोपशीर व सुंदर सुत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रा. संजयकुमार बोरसे सरांनी केले. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ समीर ठाकूर सरांनी शिरसाठ साहेबांसह उपस्थित सर्वांचे आभार मानले. या छोटेखानी कार्यक्रमासाठी परिक्षा चालू  असतानादेखील  बऱ्यापैकी विद्यार्थी देखिल उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय होऊन व शेवटपर्यंत उपस्थित राहून सदर कार्यक्रम यशस्वी केला.

वृत्त - अश्विनी निवाते 

सौजन्य -
-डॉ. विष्णू ज.भंडारे
*(प्रभारी प्राचार्य)*

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...