🔴नागपुरात मुलींसाठी 'गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त' अभियान; १४-१५ वयोगटातील मुलींना मिळणार 'HPV' लस !!
नागपूर | प्रतिनिधी
जिल्हा परिषद नागपूरच्या शिक्षण विभागाने (माध्यमिक) जिल्ह्यात 'गर्भाशय मुखाचा कर्करोग' (Cervical Cancer) मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींचे लसीकरण करण्यात येणार असून, त्याकरिता शाळांमध्ये विशेष 'पालक-शिक्षक' सभांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले. या मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनांनुसार, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
अशी असेल मोहिमेची प्रक्रिया :
माहिती संकलन: ज्या मुलींचे वय १४ वर्षे पूर्ण आहे मात्र १५ पूर्ण नाही, अशा लाभार्थी मुलींचे नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक अशी सविस्तर माहिती शाळांमार्फत गोळा केली जाणार आहे.
पालक-शिक्षक सभा: ज्या शाळांमध्ये या वयोगटातील मुली शिक्षण घेत आहेत, तिथे विशेष सभा आयोजित केल्या जातील. या सभांची तारीख आगाऊ कळवणे अनिवार्य आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी या सभांमध्ये उपस्थित राहून पालकांना व मुलींना गर्भाशयाचा कर्करोग आणि 'HPV' लसीचे महत्त्व समजावून सांगणार आहेत.
मुख्यध्यापकांना सूचना ..
जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर तातडीने जनजागृती करावी आणि लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवण्यासाठी पालकांशी समन्वय साधावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या मोहिमेमुळे भविष्यातील गंभीर आरोग्य धोके टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment