Wednesday, 11 March 2026

सभापतीपदी महेश म्हात्रे, उपसभापतीपदी परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड !

सभापतीपदी महेश म्हात्रे, उपसभापतीपदी परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड !

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) ::उरण तालुक्यातील पंचायत समितीच्या सत्तेवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता सभापती व उपसभापती पदांवरही शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ),काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री शरदचंद्र पवार गट), शेतकरी कामगार पक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची एकत्रित युती असलेल्या महाविकास आघाडीचाच झेंडा फडकला आहे.

पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी (११ मार्च) रोजी संपन्न झाली.पंचायत समितीत शेतकरी कामगार पक्षाकडे चार सदस्य तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे तीन सदस्य आहेत. त्यामुळे आघाडीच्या ठरलेल्या सूत्रानुसार सभापतीपद शेतकरी कामगार पक्षाकडे तर उपसभापतीपद शिवसेना (उबाठा) गटाकडे गेले आहे.सभापतीपदासाठी शेकापचे ज्येष्ठ सदस्य महेश म्हात्रे तर तर उपसभापती पदासाठी शिवसेना (उबाठा) गटाचे सदस्य परेश ठाकूर यांची निवड झाली आहे.निवडणूक बुधवारी दुपारी २ वाजता पार पडली असून उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.यावेळी शासनाच्या वतीने विस्तार अधिकारी विनोद मिंडे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील हे सुद्धा उपस्थित होते. निवड होताच शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या तथा नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, कामगार नेते तथा शेकाप तालुका चिटणीस रवि घरत तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सभापती महेश म्हात्रे व उपसभापती परेश ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चार वर्षांनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उरण तालुक्यात महाविकास आघाडीची लाट कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. पंचायत समितीच्या
आठपैकी सात जागांवर विजय मिळवतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या चारपैकी तीन गटांमध्येही महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

यापूर्वी उरण नगर परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने भाजपचा पराभव करून सत्ता काबीज केली होती. त्यामुळे उरण तालुक्यात महाविकास आघाडीची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.

२०१७ च्या पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस यांची आघाडी होती. त्या वेळी उरण पंचायत समितीत शेकापचे पाच, शिवसेनेचे दोन आणि भाजपचा एक सदस्य असे संख्याबळ होते. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये महाविकास आघाडीने एकजुटीच्या जोरावर तालुक्यातील राजकारणात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.


कोट (चौकट ):- 

नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे संख्याबळ:- 

जिल्हा परिषदेच्या ४ जागेपैकी ३ जागेवर महाविकास आघाडी तर १ जागेवर भाजप निवडून आले आहे तर पंचायत समितीच्या निवडणुकीत ८ जागा पैकी ७ जागेवर महाविकास आघाडी तर १ जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला आहे.

जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीत नवघर  गटातून शिवसेना ठाकरे गटाच्या प्रेरणा पाटील, जासई गटातून काँग्रेस महाविकास आघाडीचे डॉ. मनीष पाटील, चाणजे गटातून भाजपच्या रीना जितेंद्र घरत, तर चिरनेर गटातून काँग्रेसचे ऍड अविनाश ठाकूर हे जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

पंचायत समिती निवडणुकीत नवघर गणातून शिवसेना ठाकरे गटाचे परेश ठाकूर व भेंडखळ गणातून दीपक सुरेश भोईर हे विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे जासई गणातून शेतकरी कामगार पक्षाच्या माजी उपसभापती निर्मला नरेश घरत, चिर्ले गणातून प्रियंका दीपक मढवी विजयी झाल्या आहेत.चाणजे गणातून भाजपचे कैलास भोईर तर केगाव गणातून शेतकरी कामगार पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य महेश म्हात्रे यांचा विजय झाला आहे. चिरनेर पंचायत गणातून शिवसेना ठाकरे गटाच्या कविता रुपेश पाटील व आवरे गणातून शेकापच्या प्रारंभी गावंड या पंचायत समिती सदस्य पदी विजयी झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...