*कर्मभूमी छोडकर कंही नही जाउंगा*
आज हे वाक्य कायमचे मनावर कोरले गेले. हे वाक्य एका तरुणाचे ज्यांचे आजचं वय वर्षे फक्त ९१.
स्पष्ठ आवाज , बोलण्यातला कृतार्थ भाव, जीवनाच्या सांजवेळीही गाणारे डोळे, समर्पित जीवनाची कहाणी स्वतःच्या खांद्यावर घेऊन प्रवास करणारा महामेरू.
*अंधाराची खंत तू कशाला करीशी रे ..गा प्रकाश गीत* हे स्वतः संगीतबद्ध केलेले अजरामर गीत गात आजही जगतोय एकाकी आयुष्य. या थोर जादूगाराने एकेकाळी तरूणाईला आकाशवाणी वर आपल्या सांगीतिक कार्यकीर्दीने (१९७० ते १९९५ याकालखंडांत) अक्षरशः मोहिनी घातली होती त्या गीतकार, संगीतकार, प्रसिद्ध गझलकार, ज्याने अनेक मराठी हिंदी चित्रपटाला संगीत दिले त्या जादूगाराच नाव आहे *श्री डेव्हीड सॅमसंन रूबेन* अर्थात डी एस रूबेन.
या थोर माणसाची भेट इथे व्हावी? तीही वृद्धाश्रमात?
वृद्धाश्रमात जायची वेळ ठरली आणि आवश्यक ती सर्व काळजी घेत आम्ही दोघे मी आणि मित्र प्रसाद ठकार तिथे पोहोचलो. व्यवस्थापक याना ओळख सांगितल्यानंतर आम्हाला प्रवेश दिला. सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून चौकशी केली. सध्या इथे फक्त तीन चार वृद्ध आहेत असे सांगत त्यांनी आम्हाला वृद्धाश्रम दाखविले. एका वृद्धाकडे माझे लक्ष गेले. इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्यात दंग होते हे आजोबा. त्यांचेशी बोलण्यासाठी म्हणून मी त्याना दुरूनच नमस्कार केला. खणखणीत आवाजात उत्तर आले- "नमस्कार जेटलमॅन कम हियर". व्यवस्थापकाने मला त्यांच्या पर्यंत जाण्यास सांगितले.
सिंगल बेडबर बसलेले आजोबा स्वतःच बोलायला लागले , माझी चौकशी केली आणि स्वतः विषयी बोलताना म्हणाले," *जेटलमन हु आई एम ? यु नो?*
*आय एम , डी एस रूबेन* आणि बोलतच राहिले.
शेजारच्या बेडवर एक संवादिनी (हार्मोनियम) ठेवलेली. बाजूलाच ठेवलेल्या स्टुलावर चार पाच जुन्या वह्या, एक जुनी डायरी दाखवीत मला पुढे म्हणाले ,"यंग मॅन धिस इज माय प्रोपर्टी " आणि जोरात हसले.
'ओपन युवर स्मार्ट फोन अँड टाइप डी एस रूबेन ऑन गुगल यु विल गेट माय इन्फॉर्मेशन' असे म्हणत स्वतःचा तोल सावरत उठून बसत शेजारी ठेवलेल्या हार्मोनियमकडे बोट दाखवत म्हणाले ,"जस्ट अ मिनिटं"
हार्मोनियम जवळ घेत मला हातानीच खूण करून बसण्यासाठी सांगितले. आणि म्हणाले , पहचानो ये कौनसा गाना है? इतका उत्साह ...मी बघतच राहिलो .
गाणं वाजत होत *नाते जुळले मनाचे मनाशी* हां... हसत म्हणाले यु नो इट.
बऱ्याच दिवसात आपलं आवडीन ऐकणारा माणूस भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. दुसरं गाणं वाजवण्यासाठी त्यांची बोट हार्मोनियम वर सहज फिरत होती आणि सूरही लावत होते. मध्येच म्हणाले सुप्रसिध्द मराठी गायक श्री जयवंत कुलकर्णी यांनी गायलेले हे गाणे *अंधाराची खंत तू कशाला करिसी रे.....गा प्रकाश गीत.*
या अजरामर गाण्याच्या कांही आठवणी सुद्धा त्यानी सांगितल्या.
ते स्वतःविषयी सांगू लागले,
मी मराठी नाही ज्यू आहे . माझे कोणी इथे नातेवाईक नाहीत. माझा मुलगा त्याच्या मुली, मुलीच्या मुली अशी माझी फॅमिली इस्रायलला असते, ही माझी सर्व मंडळी तिकडेच स्थायिक आहेत. मी एकटाच इथे आहे. माझं छोट घर होत मुंबईला मला आता आठवत नाही बहुतेक गिरगावात होत ते मी विकल खूप वर्षांपूर्वी. आता इथे मी खुश आहे. इथली लोक माझी खूप काळजी घेतात असे म्हणत एक लांब पॉझ त्यांनी घेतला. आणि कांहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागले.
अनेक मराठी हिंदी चित्रपटाला संगीत दिलेले हे रूबेन म्हणजे हिंदुस्थानाच एक रत्नच. *आशियांना ए गझल*, *नशेमन* नावाचं एक अल्बम असल्याचेही ते म्हणाले . देखो यंग मॅन मै सी रामचंद्रजी का फॅन हुं. मुझे ऊन दिनो गझलकार कहते थे सभी लोग. 'जब मै 40-45 का था उस टाइम जो प्रोग्राम हुआ करते थे लोग मुझे सूनने के लिए थिएटर मे आते थे थिएटर हाऊस फुल हुवा करते थे.
त्या काळची तरुणाई वेडी असायची मला ऐकायला अस म्हणत त्यांनी एक गझलच मला ऐकवली शांतपणे ती म्हणजे *कौन पिता है तशनगी के लिए ..हम तो पिते है मयकीशिके लिए*
व्वा काय आवाज काय त्या गाण्यातल्या नजाकती मी तल्लीन होऊन ऐकतच राहीलो. संगीतात धुंदी पेरणारा हा माणूस नव्हे साक्षात देवच. *गाणं हे हृदयातून आलं पाहिजे* असे सांगून त्यांनी आताच्या संगीताबद्दल नाराजीही व्यक्त केली. ते म्हणाले आत्ताच्या पिढीने , सुधीर फडके, महेंद्र कपुर, मन्ना डे, यांच्यासारख्याच्या गायकीचा अभ्यास केला पाहिजे.
आता सुध्दा दररोज रियाज करतो असे म्हणत *थंड ही हवा..धुंद गारवा* हे पुष्पा पागधरे यांनी गायलेले आणि त्यानीच संगीत दिलेल्या गाण्याच्या दोन ओळी गुणगुणून दाखविल्या. वसंत आला परतूनी आणि तुझ्यावाचून करमेना या चित्रपटाला संगीत दिल्याचेही त्यांनी सांगितले.
वेळ कसा जात होता याचे भान मला राहिले नाही.
गायक, संगीतकार, गझलकार म्हणून एक काळ गाजवलेले हे महान गृहस्थ आम्हाला अशा ठिकाणी भेटतील असे कधीच वाटले नाही पण हे सत्य आहे. मी जाता जाता विचारले या आजोबांना, आपण का नाही मुलाबरोबर इस्रायल ला रहात? त्यावर त्यांच उत्तर मन हेलावणार होत, ते म्हणाले "देखो बेटा मुंबई ने मुझे पाला पोसा, नाम दिया , इस मुंबई को महाराष्ट्र को छोडके मै कंही नही जाउंगा. ये मेरी कर्मभूमी है मै इसे छोडकर कंही नही जाउंगा. मै यंहा खुश हुं। आयुष्यभर सकारात्मक विचाराने जगलेल्या या महात्म्यास एक कडक सॅल्युट करत मी निरोप घेतला.
मला वाटते अशा रत्नांना जे आज एकाकी आयुष्य जगत आहेत त्यांना एकत्र ठेवून सांभाळण्यासाठी एखादी जनतेच्या आर्थिक सहभागातुन योजना प्रत्यक्ष राबवावी जिथे साहित्य, संगीत ,क्रीडा, क्षेत्रातील नावाजलेली आपली ही मंडळी आयुष्याची संध्याकाळ सुखाने घालवतील . यासाठी माझी विना मोबदला सेवा देण्याची तीव्र इच्छा आहे.
जाताना मला हे आजोबा मला म्हणाले *सी यु यंग मॅन*
मिलिंद सरदेशमुख
रविवार ३१ मे २०२०

No comments:
Post a Comment