अंबरनाथ येथील ऐतिहासिक शिवमंदिर श्रावणात गेल्या ९६० वर्षात प्रथमच भाविकांना दर्शनासाठी बंद !!
अंबरनाथ : प्राचीन शिवमंदिर ही अंबरनाथ शहराची खरी ओळख.. दरवर्षी श्रावण सोमवारी या मंदिरात भगवान महादेवाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. महाशिवरात्रीला तर अंबरनाथमध्ये ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा भरते. या दिवशी शिवमंदिरात दर्शनासाठी अक्षरशः लाखो भाविक येतात. मात्र भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हेच शिवमंदिर यंदाच्या श्रावण महिन्यात मात्र पूर्णपणे बंद राहणार आहे, आणि याला कारणीभूत ठरलाय कोरोनाचा वाढता कहर..
कोरोना वाढू लागल्यानंतर सगळी प्रार्थनास्थळं बंद करण्याचे आदेश सरकारनं दिले. त्यानुसार शिवमंदिरही गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. केवळ मंदिराचे पुजारी मंदिरात जाऊन नित्यपूजा करत असतात. मात्र किमान श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडेल, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सुरक्षिततेचे उपाय करून मंदिरात प्रवेश दिला जाईल, अशी भाविकांची अपेक्षा होती. मात्र आता मंदिर श्रावण महिन्यातही बंद राहणार असल्याचं मंदिराचे परंपरागत पुजारी असलेले विजय पाटील यांनी जाहीर केलं आणि भाविकांचा मोठा हिरमोड झाला. मात्र हा निर्णय भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आणि गरजेचाही आहे.

No comments:
Post a Comment