पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा !!
वसई, विष्णु गुप्ता : गेल्या १५ दिवसांपासून अचानकपणे गायब झालेल्या पावसाला मंगळवार पहाटेपासून पालघर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. तसेच पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते सार्वजनिक बांधकाम चांगल्या कामामुळे खड्डेमय झाले आहेत .
गेल्या २४ तासांत वसई तालुक्यात १०२ मिलिमीटर, पालघर तालुक्यात ५९ मिलिमीटर, डहाणू तालुक्यात ४६ तर वाडा व विक्रमगड तालुक्यात प्रत्येकी सुमारे ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या डोंगराळ भागात मध्यम स्वरूपात पाऊस झाल्याची माहिती पुढे आली.
वीजपुरवठा काही तासांसाठी विस्कळीत
सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मंगळवारी पालघरमध्ये ५५ ठिकाणी वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाले. यामुळे २ लाख ४९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे उन्मळून पडून लघुदाब वीजवाहिनीच्या १६ विजेच्या खांबांचे नुकसान झाले. ५५ वीजवाहिन्यांपैकी २७ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा काही तासांनंतर सुरळीत झाला. पावसामुळे कामे करण्यात अडचणी येत असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment