ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतींची कल्याण पंचायत समितीला भेट, अंगणवाडीच्या समस्या घेतल्या जाणून !!
कल्याण (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्या परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सभापती श्रीमती रत्नप्रभा भगवान तारमळे यांनी कल्याण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागास भेट दिली. यावेळी त्यांनी अंगणवाडी सुपरवायझर च्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. व जिल्हा पातळीवर त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे निर्विकार वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. झेडपी मध्ये भाजपा असलातरी सर्व मिळून एकच असल्याने जिल्हा परिषदेत विरोध पक्ष पद नाही. त्यामुळे राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे जिथे विरोधी पक्ष पद नाही. त्यामुळे शहापूर तालुक्यातील नडगाव जिप गटातून निवडून आलेल्या श्रीमती रत्नप्रभा भगवान तारमळे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड झाली. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी कल्याण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागास भेट दिली. यावेळी कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अनिता वाकचौरे, उपसभापती रमेश बांगर, जिल्हा परिषद सदस्य वृषाली शेवाळे, जयश्री सासे, सभापती मॅडमचे पती भगवान तारमळे, पत्रकार संजय कांबळे, जयराम भोईर आणि प्रभारी प्रकल्प अधिकारी उषा लांडगे व इतर सुपरवायझर उपस्थित होत्या.
यावेळी सभापती श्रीमती रत्नप्रभा तारमळे या म्हणाल्या अंगणवाडया संस्कार केंद्र आहेत. सध्या त्या एखाद्या छोट्याश्या रोपट्यां प्रमाणे आहेत. त्यांचा वटवृक्ष बनवायचा आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कारण त्या निरोगी राहिल्या तरच लहान मुले सदृड व निरोगी होतील. त्याच्या पोषण आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे ही अंगणवाडी ची मुले देशाचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे अंगणवाडीचे काम म्हणजे मोठी देशसेवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा कामचुकार पणा चालणार नाही असा दम देखील देऊन चांगल्या कामाचे कौतुक देखील केले. कल्याण तालुक्यातील अंगणवाडीचे जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करून ते पाठवावेत अशा सूचना देऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी व समस्या समजावून घेण्यासाठी व त्याची सोडवणूक करण्यासाठी मी येथे आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती रमेश बांगर आपल्या आभारपर भाषणात म्हणाले, कल्याण पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या अगोदर आम्ही मांडला. याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडे आहे. त्यामुळे मंत्रालयात भेट दिली, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती दिली आहे. पंचायत समितीचे इमारत धोकादायक आहे. जीव मुठीत धरून लोकप्रतिनिधी व कर्मचारीवर्ग काम करतात. यावर झेडपीचे उपाध्यक्ष सुभाष दादा पवार यांनी तात्काळ इमारतीच्या दुरुस्ती साठी ७६ लाख रुपये मंजूर केले. परंतु आम्ही समाधानी नाही. कारण आमच्या कार्यकाळात नवीन इमारत व्हावी अशी आम्हा सर्व लोकप्रतिनिधी ची इच्छा आहे.
दरम्यान सभापती तारमळे मॅडम यांनी राबविलेल्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे मला अधिक माहिती मिळाली व शिकायला मिळाले असे उपसभापती बांगर म्हणाले व सभापती च्या या संकल्पनेचे कौतुक केले. तथापि यावेळी प्रभारी प्रकल्प अधिकारी उषा लांडगे व इतर सुपरवायझर यांनी विविध अडचणी व केलेल्या उपाययोजना यांची माहीती दिली. तर या प्रसंगी झेडपी सदस्या श्रीमती जयश्री सासे, वृशाली शेवाळे पत्रकार संजय कांबळे आणि जयराम भोईर यांनी मार्गदर्शन केले व सभापती रत्नप्रभा तारमळे मॅडम राबवित असलेल्या योजनेचे कौतुक केले.


No comments:
Post a Comment