दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, मुंबई - गोवा महामार्ग असे बॅनर्स लाऊन रायगड प्रेस क्लबने केले महामार्गाचे नामकरण !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : कोकणातील पत्रकारांच्या आंदोलनातून मार्गी लागलेल्या मुंबई गोवा महामार्गचे आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, मुंबई - गोवा महामार्ग, असे नामकरण रायगड प्रेस क्लबने करीत संपूर्ण जिल्ह्याभरात ठिकठिकाणी महामार्गावर फलक लावले आहेत. या अनोख्या आंदोलनाची सुरुवात पळस्पे येथे फलकाचे अनावरण करून करण्यात आली. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी अर्थात पत्रकार दिनी हे अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त अभय आपटे, मिलिंद अष्टीवकर, विजय पवार, विजय मोकल, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, भाई ओव्हाळ, बी एस कुलकर्णी, वामन पाटील, पद्माकर उभारे, दत्ता शिंदे, राजन वेलकर, विद्यमान अध्यक्ष अनिल भोळे, कार्याध्यक्ष भारत रांजणकर, सरचिटणीस शशिकांत मोरे, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, सचिव मोहन जाधव, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, माणगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष गौतम जाधव, प्रसिद्धिप्रमुख मुकुंद बेंबडे, नागेश कदम, भालचंद्र जुमलेदार आदींसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
मुंबई - गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला होता.. एकट्या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दिवसाला दीड जणांचा मृत्यू होत होता.. चार जण कायम जायबंदी व्हायचे.. ही स्थिती चिंता वाटावी अशी होती मात्र सरकारचं लक्ष नव्हतं आणि कोणत्याही राजकीय पक्षांना काही देणं घेणं नव्हतं.. संवेदनशील मनाचे पत्रकार बथ्थड मनानं मृत्यूचं वार्तांकन करू शकत नव्हते.! मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पत्रकारांनी हातातील लेखणीच्या माध्यमातून या विरोधात आवाज उठवत मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी लावून धरली. मात्र सत्ता दखल घेत नव्हती. तेव्हा एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं करण्याचा निर्णय घेतला. 2 ऑक्टोबर 2008 रोजी वडखळ नाक्यावर पहिलं रस्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर सलग सहा वर्षे मानवी साखळी, धरणे, उपोषणं, मश्याल मार्च, लॉंग मार्च, अशा सनदशीर मार्गांनी आंदोलनं केली. पत्रकार आंदोलनं करीत होती तेव्हा सारेच राजकीय पक्ष गप्पगार होते. मात्र 2012 च्या अखेरीस महामार्गाच्या रूंदीकरणाचं काम सुरू झालं आणि श्रेय लाटण्यासाठी सारे राजकीय पक्ष धावाधाव करू लागले. आजही ही धडपड थांबलेली नाही. मात्र हे काम कोणामुळे मार्गी लागलं हे कोकणातल्या जनतेला पक्कं माहित होतं. त्यामुळे सामांन्य कोकणी माणूस विभागातील पत्रकारांना धन्यवाद देत असतो.
पत्रकारांनी एखादा सामाजिक प्रश्न हाती घेतला, त्यासाठी पाच सहा वर्षे लढा दिला आणि त्यात यश मिळवायची ही अनोखी घटना आहे. संयुक्त महाराष्ट्रानंतरचा पत्रकारांनी लढलेला हा एकमेव प़दीर्घ लढा होता. हा मार्ग आता पूर्ण होत आला आहे. पत्रकारांच्या लढयामुळे हा महामार्ग होत असल्याने महामार्गास आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर याचं नाव द्यावं अशी मागणी सर्वप्रथम कोकणातील पत्रकारांनी केली. तर राजकारण्यांनी त्यालाही फाटे फोडले. अनेकांनी वेगवेगळी नावं पुढं करून नामांतराचा वाद सुरू केला. मात्र पत्रकारांनी दर्पणकारांच्या नावाच्या मागणीचा आग्रह कायम ठेवला. बाळशास्त्रीं हे कोकणातले, सिंधुदुर्गचे सुपूत्र असल्याने त्यांचे नाव या महामार्गाला देऊन साहित्यिक, कलावंत, पत्रकारांचे कार्य देखील कमी लेखत नाही हे सरकारनं दाखवून द्यावे, प़त्येक वेळी राजकीय नेत्याचीच नाव द्यावं असं काही नाही.. समाजात अन्य क्षेत्रातील लोकांचं योगदान कमी लेखणयाचं कारण नाही..सरकारनं हे वास्तव स्वीकारत महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशी पुनर्रमागणी एस एम देशमुख यांनी या निमित्ताने केली आहे. अर्थात सरकार काय निर्णय घेईल ते घेऊ द्या.. आम्ही मात्र आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, मुंबई गोवा महामार्ग असं या मार्गाचे नाव नक्की केलं असून तसे फलक महामार्गावर पत्रकार दिनी ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

No comments:
Post a Comment