महिला दिन विशेष: २१ व्या शतकातील हिरकणी !
नऊवारी नेसून सात मिनिटांमध्ये सर केला नागफणी सुळका......
पुणे : महिला दिन… 'खरं तर महिलांचा सन्मान आणि कौतुक' करण्याचा दिवस आहे.
तसं पहिल्यास महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर पाहायला मिळतात. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून थरारक खेळांमध्येही कुठेही कमी नाहीत हे दाखवण्यासाठी काही तरुणींनी एक खास आव्हान स्वीकारत नऊवारी नेसून लोणावळ्यातील नागफणी सुळका सर केला आहे. विशेष म्हणजे अनेक ट्रेकर्सला खुणावणारा हा सुळका या महिलांनी नऊवारी साडीत अवघ्या सात मिनिटांमध्ये सर केला.
पुण्यातील ‘इंडिया ट्रेक्स’ने महिला दिनानिमित्त हा अनोखा साहसी उपक्रम राबवला. पुण्यातील या आगळ्यावेगळ्या उपक्रमामध्ये ४० जणींनी सहभाग नोंदवला. या मोहिमेच्या निमित्ताने अत्यंत थरारक अनुभव घेता आल्याचं समाधान सहभागी महिला आणि तरुणींनी व्यक्त केलं.
नागफणी सुळका हा तीनशे फूट उंच असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. पुण्यातील काही तरुणींनी ‘इंडिया ट्रेक्स’च्या सहयोगाने या वर्षीचा महिला दिवस अनोखा करायचा ठरवलं होतं. त्यानुसार, बहुतांश तरुणींनी नऊवारी नेसून नागफणी सुळका सर केलाय. तीव्र चढ, नागमोडी वाटा, घनदाट झाडी अश्या समस्यांना तोंड देत नागफणी सुळक्याच्या पायथ्यापासून वर जावं लागतं.
सर्व सहभागी महिला नऊवारी सावरत पायवाटेवरुन एक एक पाऊल पुढे टाकत अथक परिश्रम घेत नागफणीच्या मुख्य टोकापर्यंत पोहचल्या. त्यानंतर, रॅपलिंगचं साहित्य जोडून सुळक्यावरून खाली उतरण्याची तयारी करण्यात आली. यापैकी अनेक तरुणी पहिल्यांदाच रॅपलिंग करत होत्या. अनेक तरुणींनी मराठमोळ्या वेशात रॅपलिंग करताना देखील निडरपणे या नागफणी सुळक्याचं आव्हान फत्ते केलं.

No comments:
Post a Comment