बल्याणीत जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण..
विनयभंग प्रकरणी बांधकाम व्यवसायिक अजय सावंत यांच्यावर गुन्हा दाखल...
टिटवाळा, उमेश जाधव -: बल्याणी येथील खराडे कुटूंबियांना बांधकाम व्यवसायिक अजय सावंत यांनी धक्काबुक्की करून ज्योती खराडे यांचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. महिलेचा विनयभंग करून खराडे कुटुंबियांना मारहाण केल्याची तक्रार टिटवळा पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
सुभाराव खराडे व ज्योती खराडे हे बल्याणी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास असून या दाम्पत्यांनी २०१४ रोजी अजय सावंत यांना दोन गुंठे जमीन विकली होती. परंतु या जागेवर अजय सावंत यांनी अधिक खोल्यांचे बांधकाम करून खराडे यांच्या जागेवर अतिक्रण केले असल्याने खराडे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडे चाळींच्या खोल्या हटविण्याबाबत तक्रार केली होती. पालिकेने चाळींचे अनधिकृत बांधकाम हटवून जागा मोकळी करून दिली या कारणावरून अजय सावंत यांनी संतप्त होऊन खराडे कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ज्योती खराडे यांनी अनधिकृत बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यामुळे माझ्या जागेतील बांधकामावर कारवाई झाली आहे याचा राग येऊन बांधकाम व्यवसायिक अजय सावंत यांनी ज्योती खराडे व सुबराव खराडे या दांपत्यास धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच ज्योती खराडे यांचा विनयभंग केला या प्रकरणी अजय सावंत यांच्या विरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५५४, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक काजोल यादव करत आहेत.


No comments:
Post a Comment