धम्म चक्र प्रवर्तन दिनी अभूतपूर्व धम्म रॅलीच्या बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि ! संघम शरणं गच्छामि च्या मंगल सूरांनी माणगांव मंगलमय झाले....!
बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वसम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या महान ऐतिहासिक धम्म क्रांतीमुळे भारतात धम्म चक्र प्रवर्तन करण्यात आले होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली स्वत: बौध्द धम्माची दीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांना बौध्द धम्माची दीक्षा देऊन तत्कालीन विषमतावादी व्यवस्थेने मानवीय अधिकार नाकारलेल्या समाजाला माणुस म्हणुन जगण्याचे मानवीय हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले होते. त्यामुळे या दिनाला बौद्ध धम्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या ऐतिहासिक धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचीत्य साधून रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्व बौध्द संघटनांनी एकत्र येऊन शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत एक विशाल धम्म शांती विजय शोभा यात्रेचे तथा रॅलीचे आयोजन केले होते.
या विशाल शोभा यात्रेची माणगांव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथून भव्य धम्म रथाच्या समवेत सुरुवात झाली. या विशाल शोभा यात्रेत माणगांव तालुक्यातील तमाम आबालवृद्ध बौद्ध समाज बांधव आणि भगिनी शुभ्र वस्त्रे परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि! संघम शरणं गच्छामि !च्या मंगल स्वरात सदर धम्म शोभा यात्रा रॅली माणगांव बाजारपेठेतून अत्यंत शांततेत मार्गक्रमण करीत पुढे माणगांव वाकडाई नगर, कालवा रोड येथील विहारात येऊन तिथे या विशाल आणि अभूतपूर्व धम्म विजय शोभायात्रेची तथा धम्म रॅलीची सुसांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment