Tuesday, 9 November 2021

२७ गावातील वाढीव मालमत्ता कराची केडीएमसी मुख्यालयासमोर होळी !! "संघर्ष समितीची पालिकेवर धडक"

२७ गावातील वाढीव मालमत्ता कराची केडीएमसी मुख्यालयासमोर होळी !! "संघर्ष समितीची पालिकेवर धडक" 


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण ग्रामीणमधील २७ गावातील नागरीकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी वाढीव मालमत्ता करांच्या बिलाची होळी करण्यात आली. २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार आणि उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानंतर दहा पटीने मालमत्ता कर वाढविण्यात आला असल्याचा आरोप संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला. या आंदोलनास मनसेचा पाठिंबा होता. शिष्टमंडळाने महापालिकेच्या अधिका:यांना भेटून निवेदन सादर केले. वाढीव मालमत्ता कर रद्द करा अशी मागणी केली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, दत्ता वझे, गजानन मांगरूळकर, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर, सत्यवान म्हात्रे आदी प्रमुख पदाधिकार्यासह मनसेनेही आंदोलनाला पाठींबा देत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर व डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत आदी आंदोलनात सहभागी झाले होते.


२७ गावातील नागरिक कर भरणार नाहीत. जर पालिकेचे अधिकारी कर्मचारी जबरदस्तीने कर वसूल करण्यासाठी आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची राहील असा इशारा दिला. केडीएमसीकडून २७ गावात आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराच्या रकमा अव्वाच्या सव्वा असल्यामुळे या कर बीलाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बिलाच्या रकमा कमी करण्यासाठी वारंवार मागणी २७  गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीकडून केली जात आहे.


आज संघर्ष समितीच्या वतीने शेकडो नागरिकांसह मालमत्ता कर बिलाची पालिका मुख्यालयासमोर होळी करत महापालिकेचा निषेध केला. यावेळी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. मालमत्ता कर कमी करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली तसेच बिलाच्या रकमा कमी न करता अधिकारी वसुलीसाठी आल्यास त्याला उत्तर दिले जाईल असा कडक इशाराच संघटनेकडून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...