व्हेल माशाची कोट्यवधींची उलटी घेऊन ठाण्यात आलेल्या दोन तस्करांना पोलिसांनी केली अटक.!!
भिवंडी, दिं,18 , अरुण पाटील (कोपर) :
भारतात व्हेल माशाच्या उलटीच्या खरेदी-विक्रीस बंदी आहे. मात्र, तरीही काही आरोपी या माशाच्या उलटीची तस्करी करतात. यामागील कारण म्हणजे व्हेल माशाच्या उलटीची असलेली किंमत. आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेल माशाच्या उलटीला प्रचंड किंमत आहे. कोट्यवधी रुपयांना ही उलटी विकली जाते. त्यामुळे भारतात लपतछपत काही आरोपी या उलटीची तस्करी करण्याचा प्रयत्न करतात.
ठाण्यात अशाच दोन तस्करांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींकडे तब्बल सव्वा दोन कोटींची व्हेल माशांची उलटी सापडली आहे. खरंतर या उलटीला अंबर ग्रीस असंही म्हणतात. आरोपींकडे सापडलेलं सव्वा दोन कोटींचं अंबर ग्रीस पोलिसांनी जप्त केलं आहे.
आरोपी अंबर ग्रीसच्या तस्करीसाठी ठाण्यातील किसननगर परिसरात आले होते. पण गुप्त बातमीदारांकडून आरोपी अंबर ग्रीसच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच लागली होती. त्यामुळे पोलिसांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संबंधित परिसरात सापळा रचला. आरोपी परिसरात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
ठाणे पोलिसांनी पकडलेल्या या दोन आरोपींचे नावे मयूर देवदास मोरे आणि प्रदीप मोरे अशी आहेत. त्यांच्याकडून जवळपास अडीच किलो अंबर ग्रीस जप्त करण्यात आलं आहे. या अंबर ग्रीसची किंमत ही सव्वा दोन कोटी रुपये इतकी आहे. खरंतर अंबर ग्रीसच्या खरेदी किंवा विक्रीला भारतात बंदी आहे. पण तरीही अशाप्रकारे तस्करी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजून सुरु आहे. आरोपी नेमकं कुणाला ते विकणार होते? किंवा ते अंबर ग्रीस नेमकं कुठे घेऊन जाणार होते? याचाही शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली.
व्हेल माशाच्या उलटी म्हणजेच अंबर ग्रीसला परफ्यूम उद्योगात प्रचंड महत्त्व आहे. अंबर ग्रीस हे व्हेल माशाची उलटी जरी असली तरी त्याचा खूप चांगला सुगंध असतो. हा गंध फार काळ टिकून राहतो. त्यामुळे परफ्यूमच्या उद्योगात अंबर ग्रीसला जास्त मागणी आहे. याशिवाय अंबर ग्रीस हे नैसर्गिक असल्याने त्याच्या गंधाचा मानवी शरीरावर काहीही वाईट परिणाम होत नाहीत. त्यामुळे देखील ग्राहक अंबर ग्रीसचे परफ्यूम वापरतात. पण अंबर ग्रीसचा अंश असलेले परफ्यूम हे प्रचंड महाग देखील असतात.
No comments:
Post a Comment