कोरोना नंतर शिर्डीत पहिल्यांदा दीपोत्सव साजरा !!
भिवंडी, दिं,5, अरुण पाटील (कोपर) :
महाराष्ट्रातील मंदीर खुले झाल्यानंतर पहिल्यांदा आलेला दीपोत्सव साजरा करण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने जय्यत तयारी केली आहे. मंदिरावर रोषणाई आणि सजावटही करण्यात आली आहे. लक्ष्मी पूजनाच्यावेळी दर्शन थांबवण्यात आले असले तरी पूजा संपताच पुन्हा दर्शन सुरू करण्यात आले. यावर्षी भाविकांनाही दीपोत्सवाचा आंनद लुटता आला आहे. कोरोना संबंधीच्या सर्व नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा केला जाणार असल्याचे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले.
संस्थानतर्फे परंपरेनुसार दीपावली श्री लक्ष्मीपूजन उत्सव गुरुवारी (४ नोव्हेंबर) रोजी साजरा करण्यात आला आहे. सायंकाळी ५ ते ६ यावेळेत साईबाबा समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला. या वेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कुबेर पूजन, सरस्वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य असे कार्यक्रम करण्यात आले सायंकाळी ५ वाजता दर्शनरांग बंद करून लक्ष्मी-कुबेर पूजन झाल्यानंतर श्रींची धुपारती होऊन पावणेसात वाजता साई भक्तांसाठी दर्शनरांग सुरू करण्यात आली.
शनि शिंगणापूर येथील गणेश शेटे यांच्या वतीने देणगी स्वरूपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिर्डी येथील साईभक्त विजय तुळशीराम कोते यांच्या देणगीतून समाधी मंदीर, द्वारकामाई, चावडी व गुरूस्थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. रतलाम येथील श्री साई सेवा समिती ट्रस्ट यांच्या वतीने मंदीर परिसरात व प्रवेश द्वारावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. दीपावली श्रीलक्ष्मी पूजन उत्सवाचे सर्व कार्यक्रम करोना नियमांचे पालन करून करण्यात आले.
शिर्डी साई मंदिर येथे दरवर्षी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या वर्षा पासून कोरोनामुळे त्यावर बंधने आली आहेत. असे असले तरी या वेळी मंदीर दर्शनासाठी खुले असल्याने दिवाळीत भाविकांना दर्शन उपलब्ध झाले आहे. मात्र, अद्यापही केवळ ऑनलाइन दर्शनपास घेतलेल्या भाविकांनाच दर्शन घेता येत आहे. आता करोनाचे प्रमाण कमी झाले आहे. शिर्डीत करोना रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे आता भाविकांना ऑफलाइन दर्शन पास घेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी भाविक आणि शिर्डीतील पदा धिकाऱ्यां कडूनही करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment