राज्यात शंभर टक्के लॉकडाऊनची गरज नाही, मात्र विकेंड लोकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आरोग्य मंत्री - राजेश टोपे
भिवंडी, दिं,6, अरुण पाटील (कोपर) :
राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी, शंभर टक्के लॉकडाऊनची गरज ला गणार नाही. परंतु, विषाणूला आळा घालण्यासाठी गर्दीवर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. मात्र विकेंड लोकडाऊन चा निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आटोक्यात आलेल्या कोरोनाने राज्याची पुन्हा डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या चोवीस तासांत 18 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉनचेही रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केवळ आरटीपीसीआर टेस्टच नव्हे तर, अँटिजेन टेस्टवरही भर द्यायला हवा, असा निर्णय घेण्यात आला. या टेस्टसाठी लागणारी सामग्री जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी करून त्याचा हिशोब प्रशासनाला द्यावा. किती टेस्ट पॉझिटिव्ह येतील, त्याचा अहवालही जिल्हा धिकाऱ्यांनी सादर करण्याच्या सूचना दिल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.
आता कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे, रुग्णसंख्या सुमारे 30 हजारपर्यंत जाऊ शकते. आरटीपीसीआर टेस्ट केल्यास ताण येईल. त्यामुळे, रॅपिड अँटिजेन टेस्ट करणार. या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार नाही. परंतु, किऑक्सद्वारे अँटिजेन कराव्या, अशा सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच, फेविपीरावीर आणि मोलनूपिरावीर ही दोन औषधे सध्या प्रभावी ठरत आहेत. मोलनूपिरावीरची उपलब्धता नाही. त्यामुळे, ती वाढविण्यासाठी केंद्राला विनंती केल्याचे टोपे यांनी सांगितले
केंद्र सरकारने आर्ग्युमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द प्रयोग केला आहे. त्यामुळे, लॉकडाऊन शब्द आता वापरता येणार नाही. नॉन इसेन्शियल ॲक्टिव्हिटी तपासावी लागणार आहे. तसेच, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी शंभर टक्के लॉकडाऊन लावावा लागेल, असे नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्बंध कठोर करावे लागतील, असे टोपे म्हणाले. क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा केला आहे. तसेच लसीकरणवर भर दिला असून ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगून लसीकरण केले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment