मुंबईत आजपासून दिवसा जमाव बंदी तर रात्रीची संचार बंदी लागू .!!
भिवंडी, दिं,१०, अरुण पाटील (कोपर) : कोरोना रुग्णांच्या सातत्याने वाढणार्या संख्येमुळे राज्यात नव्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज मध्य रात्रीपासून ही सर्व नियमावली राज्यात लागू करण्यात आली आहे. नियमावलीनुसार आता राज्यात १० जानेवारी पासून दिवसा जमवबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यातील कोरोनाच्या तिसर्या लाटेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि रुग्णांच्या सातत्याने वाढणार्या संख्येमुळे राज्यात नव्याने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि इतर यंत्रणांबरोबरील बैठकीनंतर या निर्बंधांची घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून ही सर्व नियमावली राज्यात लागू करण्यात आली आहे.
इतर राज्यातून महाराष्ट्रात येताना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे बंधनकारक असेल. त्या नागरिकांना आरटीपीसीआर अहवाल सादर करावा लागणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार रात्रीची संचारबंदी ११ वाजता सुरू होऊन ती पहाटे ५ वाजेपर्यंत लागू राहील. तर दिवसा जमावबंदी असणार आहे. आजपासून या नवीन नियमावलीला सुरुवात झाली आहे .
राज्यात रविवारी सुमारे ४४ हजार ३८८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात १५ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक १९ हजार ४७४ रुग्ण सापडले. शनिवारी २० हजार रुग्ण आढळून आले होते. तर, राज्यात २ लाख रुग्ण सक्रिय आहेत. दुसरीकडे आज ओमायक्रॉनच्या रुग्णांनी २०० चा टप्पा पार केला आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

No comments:
Post a Comment