गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल -रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन खुले, भावीकांची गर्दी, नामघोशांनी अवघी दुमदुमली पंढरी !!
भिवंडी, दिं,३, अरुण पाटील (कोपर) :
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनास गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात झाली. दोन वर्षे दुरावलेल्या विठ्ठलाच्या चरणावर डोई टेकवून कृतार्थ झालेल्या वारकऱ्यांंनी समाधान व्यक्त केले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात फळ आणि फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती.
शनिवार पासून देवाचे पदस्पर्श, मुखदर्शन आणि संत नामदेव पायरी, कळस असे ५ प्रकारचे दर्शन सुरू झाले आहे. कोरोनामुळे १७ मार्च २०२० पासून दोन वर्षे बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद होते. शनिवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ते पुन्हा सुरू करण्यात आले. पहाटे पारंपरिक काकड आरती झाल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे पुष्पवृष्टी करून मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी भाविकांचे स्वागत केले.
श्री विठ्ठलाच्या पायावर माथा टेकवण्याची तब्बल दोन वर्षांनी संधी मिळाल्यामुळे भाविकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. कोरोनाची तीव्रता कमी झाली असली तरी काळजी घेतली जात आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मास्कची सक्ती कायम ठेवली आहे.
पुणे जिल्ह्यातील चिखली येथील नाना बबन मोरे, नवनाथ नामदेव मोरे या भाविकांच्या वतीने झेंडू, जरबेरा, शेवंती, गुलछडी, ओरकिट, ग्लायवोड, गुलाब, तगर आदी २ टन फुलांची आरास करण्यात आली. अननस, डाळिंब, संत्रा, कलिंगड, सफरचंद आदी ११०० किलो फळांचा वापर करून गाभाऱ्यात आरास केली होती.
भाविकांना तुळशीहार मंदिरात नेण्याचीही मुभा दिली आहे. त्यामुळे हार विक्रेते, प्रासादिक साहित्य विक्रेतेदेखील समाधानी आहेत. पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने शनिवारी सकाळी दर्शनरांग भुतेश्वर मंदिराच्या पुढे गेली होती. रविवारी गर्दी होण्याची शक्यता समितीने गृहीत धरून भाविकांच्या सुविधांची तयारी केली आहे. मंदिर समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त तीन ठिकाणी गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.

No comments:
Post a Comment