Wednesday, 6 July 2022

नितीन आसयेकर फॅन क्लबचा चौथा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न !! "मुसळधार पावसातही संयुक्त नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद ; हरित संकल्पना राबवत मान्यवरांचा सन्मान सोनचाफा रोपने"

नितीन आसयेकर फॅन क्लबचा चौथा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न !!

"मुसळधार पावसातही संयुक्त नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद ; हरित संकल्पना राबवत मान्यवरांचा सन्मान सोनचाफा रोपने"


मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर )
               दशावतार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, दशावतारी कलाकार, आजारी व्यक्ती, अपघातग्रस्त व पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर, दशावतारी नाटक आयोजन ई. अनेक सामाजिक उपक्रमात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या नितीन आसयेकर फॅन क्लब या ग्रुपचा चौथा वर्धापन दिन सुमारे दीड हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत वासुदेवानंद ट्रेड सेंटर, उद्यमनगर, कुडाळ येथे जल्लोषात साजरा झाला. याप्रसंगी 'महारथी कर्ण' या संयुक्त दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
            या कार्यक्रमास अध्यक्ष श्री. दत्ता सामंत, प्रमुख अतिथी पद्मश्री श्री. परशुराम गंगावणे तसेच मान्यवर श्री. रणजित देसाई, श्री. कृष्णा धुरी, डॉक्टर श्री. योगेश नवांगुळ, श्री. श्रीधर गोरे तसेच श्री. राजा सामंत, श्री. शरद मोचेमाडकर, श्री. देवेंद्र नाईक, श्री. सिद्धेश कलिंगण, श्री. बंड्या गोवेकर, श्री. दयानंद चौधरी, श्री. नारायण आसयेकर, श्री. नितीन आसयेकर ई. व्यासपीठावर उपस्थित होते.दिप प्रज्वलन, गणेश प्रतिमा व छ. शिवाजी महाराज प्रतिमा पूजन, श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वर्षभरात आपल्याला सोडून गेलेले लोकराजा श्री सुधीर कलिंगण, श्री शंकर मोर्ये, ग्रुप सदस्य श्री प्रशांत घाडी, श्री भूषण देसाई यांच्यासह दिवंगत सर्व सुहृदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर नितीन आसयेकर फॅन क्लबच्या लोगोचे अनावरण तसेच श्री. नितीन आसयेकर यांच्या प्रोफाईलचे (दुसरी आवृत्ती) मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दशावतारात प्रथमच एखाद्या कलाकारांच्या नावाने बनलेल्या या प्रोफाईलची निर्मिती श्री. राजेश म्हापणकर यांनी केली आहे. त्यानंतर उपस्थित गृप संचालकांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी गेल्या चार वर्षातील गृपच्या एकूण उपक्रमांचा कार्य अहवाल सादर करताना स्क्रिनवर गृपच्या आतापर्यंतच्या वाटचालीचे दर्शन घडविण्यात आले.
             नेहमीच्या शाल श्रीफळ परंपरेला फाटा देऊन यावेळी ग्रुपने अनोखी हरित संकल्पना राबवली, मान्यवरांचा सन्मान सोनचाफा रोप व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. श्री. नितीन आसयेकर यांचा मनोरमा चॅरिटेबल ट्रस्ट, वालावल' यांचेकडून शाल, श्रीफळ सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. गृपसाठी अविरत झटणारे गृप संचालक, कोअर कमिटी यांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच जेष्ठ नाट्यरसिक श्री. मधु भटजी, पेंडूर यांच्या नाट्यरसिकतेचा गौरवास्पद उल्लेख व्यासपिठावर करण्यात आला. गृपतर्फे संचालक श्री. प्रणिल नार्वेकर यांनी मनोगत व्यक्त केले, श्री. राजा सामंत आणि प्रमुख पाहुणे पद्मश्री श्री परशुराम गंगावणे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दत्ता सामंत यांनी गृपचे उपक्रम अत्यंत स्त्युत्य आहेत असे सांगत आयोजकांचे कौतुक केले व हा नयनरम्य सोहळा एकदिवशीय न होता तीन दिवसाचा व्हावा असे प्रांजळ मत व्यक्त कले व त्यासाठी आपण नेहमी सहकार्य करू असे आश्वासनही दिले. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेला संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग 'महारथी कर्ण' सादर करण्यात आला. गृपच्या वतीने सर्व नाट्य कलाकारांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गृपचे संचालक श्री. विनायक भागवत, श्री. प्रणिल नार्वेकर, श्री. नितीन आसयेकर तसेच कोअर कमिटी सदस्य श्री. आनंद म्हापणकर, श्री. अशोक आरोलकर, श्री. बादल चौधरी, श्री. राजेश म्हापणकर, श्री. प्रदीप चव्हाण, मनोज पाटकर, संतोष तेंडोलकर, भरत चुडनाईक, मनोज घाडी, विराज धुपकर, गुरुनाथ पारकर, सुधीर राऊळ, व सर्व सक्रिय सदस्य यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला नितीन आसयेकर फॅन क्लब या गृपचे सदस्य, दशावतारी कलावंत, नाट्य मंडळांचे मालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन श्री. बादल चौधरी यांनी केले, आभार श्री. प्रदीप चव्हाण यांनी व्यक्त केले तर छायाचित्रकार म्हणून श्री. प्रविण सावंत यांनी काम पाहीले. हा संपुर्ण कार्यक्रम लवकरच कोकणसाद लाईव्ह या चॅनेलवरून प्रसारीत करण्यात येणार आहे.
          संपुर्ण कार्यक्रम उत्तम नियोजन व शिस्तबध्द वातावरणात संपन्न झाला. यापुढे लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा व जबाबदारी लक्षात घेऊन असेच विधायक कार्य अविरत सुरु ठेवण्याचा निर्धार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...