ग्रामिण भागात रस्त्यांचे झाले ओढे, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष !
जव्हार- जितेंद्र मोरघा :
पालघर जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेले, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या सिमेवर वसलेल्या दाभलोन या गावात अद्यापही डांबरीकरणाचा रस्ताच पोहोचलेला नाही. त्यामुळे पावसाच्या जोराने इथल्या कच्चा रस्त्यांना पावसाने चांगलेच उखडून काढले आहे. या रस्त्यांच्या दुतर्फा पाणी वाहुन जाण्यासाठी गटारी न खोदल्या गेल्यामुळे नागरीकांना व वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे, पावसाने पुर्णच रस्ता धुवून काढला आहे.
जव्हार तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील सर्वाधिक कमी मनुष्य दिवस निर्मिती या गावात झाली असुन एकही रस्त्यांच्या दुतर्फा गटारी खोदण्याचे काम झालेले नाही त्यामुळे रस्त्यावर पाणी उतरल्याने इथल्या रस्त्यांना ओढे निर्माण झालेले आहेत त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असुन, त्यांना ये-जा करतांना जीवघेणी स्पर्धा करावी लागत आहे. स्वातंत्र्य काळापासून इथे रस्ताच पोहोचलेला नसल्या कारणाने दरवर्षी ग्रामस्थांना या समस्येला तोंड द्यावे लागते. ग्रामस्थांकडून वारंवार डांबरी रस्त्याची मागणी करण्यात आली असतांना सुद्धा, प्रशासनाने हि याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
ग्रामस्थ या समस्येला कंटाळले असल्यामुळे, मागच्या वर्षी गावातील तरुण एकत्रित येऊन श्रमदानातुन रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे काम केले होते, परंतु पाण्याच्या जोराने पुन्हा रस्त्यांचा धुव्वा उडवला आहे. आता, प्रशासन यावर लक्ष देईल का? याकडे सर्वांचेच डोळे लागलेले आहेत.

No comments:
Post a Comment