Friday, 26 August 2022

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा रशियात गौरव पण... 'महाराष्ट्रात मात्र उपेक्षा'- काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा रशियात गौरव पण... 'महाराष्ट्रात मात्र उपेक्षा'- काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :

         थोर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नायक अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव विविध स्तरावर केला जातो. रशियानेही अण्णा भाऊंच्या कार्याची दखल घेत मास्को शहरात पुतळा उभारला पण अण्णांच्या जन्मभूमीत, महाराष्ट्रात मात्र त्यांची उपेक्षा होत असल्याचे दिसत आहे. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी राज्य सरकारने अजूनही ठराव करुन केंद्र सरकारला पाठवलेला नाही. साहित्यरत्न अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात तरी राज्य सरकार ठराव करेल काय? असा सवाल राष्ट्रीय मातंग महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी विचारला आहे.
          रशियाची राजधानी मास्को मध्ये अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवून त्यांच्या कार्याचा गौरव करत असल्याबद्दल राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मास्कोतील स्थानिक संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची दखल जग घेत आहे पण थोर महापुरुषांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्याच राज्यात त्यांची उपेक्षा होत आहे. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारने सन्मानित करावे यासाठी विविध स्तरातून मागणी केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष असताना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करावा अशा आशयाचे पत्र लिहून राज्य सरकारला मागणी केली होती. त्यानंतर 200 पेक्षा अधिक आमदारांनी भारतरत्नची मागणी करणारी पत्र मुख्यमंत्री, तर अनेक खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली होती पण त्यावर अद्याप कार्यवाही झालेली दिसत नाही.
         साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आश्वासने दिली जातात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. राज्य सरकारने आतातरी अण्णा भाऊ यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करून या महापुरुषाचा यथोचीत सन्मान करावा, अशी मागणी राजहंस यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

अवयवदान एक संकल्प - जनजागृतीच्या मार्गावर सुनील देशपांडे

अवयवदान एक संकल्प - जनजागृतीच्या मार्गावर सुनील देशपांडे  वयाच्या साठाव्या वर्षानंतर म्हणजेच ज्येष्ठ नागरिक (सीनियर सिटीजन झाल्य...